Breaking News

विरोधकांच्यात 'ही' क्षमता नाही - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
Unveiling of the statue of Lokmanya Tilak by Ramraje Naik Nimbalkar

लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याचे  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते अनावरण 

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  आमच्या थोड्या चुका असतील, मी त्या मान्य करेन, पण आम्ही काहीच कामे केली नाहीत, असा जर कोणी आरोप करत असेल तर ते मी मान्य करणार नाही, झालेल्या चुका निश्चितपणे सुधारु पण आम्हाला नाकारण्यापूर्वी आम्ही केलेल्या चुका सावरण्याची किंवा सुधारण्याची क्षमता विरोधकांच्यात आहे का ? याचाही  विचार नागरिकांनी जरुर करावा. चुका झाल्या, त्याची शिक्षा म्हणून जर मते द्यायची नाही, असा विचार केला तर हे एकांगी होईल, आम्ही प्रामाणिकपणे फलटणचा विकास केला आहे आणि याची  पावती आम्हाला मिळाली पाहिजे. पुढील काळात फलटणला स्मार्ट सिटी करण्याचे काम आम्हीच करू शकू याचा ठाम विश्वास आम्हाला आहे, विरोधकांच्यात 'ही' क्षमता नाही, विरोधक काय करतात आणि काय नाही, ते निवडणुकीच्या वेळी बोलेनच, परंतु विरोधकांची अशी जर  भावना असेल की, बारामती कडे जाणारा औषधांचा ट्रक त्यांनी अडवला म्हणून कोव्हीड दूर झाला, तर ते चुकीचे असल्याचे  श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.

लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याच्या अनावरण केल्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण व इतर मान्यवर 

     फलटण शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील शंकर मार्केट परिसरात पुनर्स्थापना करण्यात आलेल्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याचे अनावरण ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी श्रीमंत रामराजे बोलत होते. कार्यक्रमास  आ. दिपकराव चव्हाण, नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे, बांधकाम समिती सभापती श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, पाणी पुरवठा समिती सभापती  अॅड. सौ. मधुबाला भोसले, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, सौ. प्रगतीताई कापसे, सौ. सुवर्णाताई खानविलकर, सौ. वैशालीताई चोरमले, श्रीमती रंजनाताई कुंभार, नगरसेवक सनी अहिवळे, बाळासाहेब मेटकरी, अजय माळवे उपस्थित होते.

    श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, व्हायरसमुळे किंवा चिकन गुनिया सारख्या आजार येतात त्याला आपल्याला सक्षमपणे तोंड द्यावे लागणार आहे. जे आपल्या हातात आहे, शासन पातळीवरून जे आणावे लागते त्याला मी कुठेही कमी पडलेलो नाही, मागील तीस वर्षात फलटण तालुक्यासाठी निधी आणण्यात मी कुठेही कमी पडलेली नाही. आमच्या थोड्या चुका असतील, मी नाही म्हणणार नाही, घंटागाडी येत नसेल किंवा पाणी न सुटण्याच्या  अशा अडचणी येत असतील, या मी मान्य करतो, परंतु त्या सोडवण्यासाठी मूलभूत प्रयत्न होत आहेत, हे आपणाला लक्षात घ्याला लागणार आहे.  मी काही नगरपालिकेचे कौतुक करत नाही,  नगरपालिकेच्या काही चुका असतील, योग्य वेळेस  मी त्याला तोंड फोडणार असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.

विशेष मानपत्र देवून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा नागरी सत्कार करताना नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व सौ. प्रगतीताई कापसे

    लोकमान्य टिळकांचे कार्य, त्यांनी स्वातंत्र्यासाठी घातलेला पाया याचे स्मरण करणे आवश्यक आहे आणि तरुण पिढीला देखील त्याची जाणीव करून देणे आवश्यक असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी सांगून,  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जी गडबड उडाली होती, बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ची कमतरता जाणवली, ती परिस्थिती आता राहिली नाही. उपजिल्हा रुग्णालयासह खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील सर्व सोयी सुविधा केल्या आहेत. दुर्दैवाने जर कोव्हीड ची साथ आलीच तर साताऱ्याला न जाता, फलटण मध्येच सर्व सोयीसुविधा उपलब्ध केल्यामुळे आपण समर्थपणे तोंड देऊ शकू असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिला.

    आज बरेच दिवसांनी मंडई येथे आलो आहे,  पाठीमागे कोव्हीड मुळे, फिरता येत नव्हते आणि आता मी बाहेर फिरायला गेलो तर नगर पालिका निवडणूक  इच्छुकांची गर्दी वाढत आहे, त्यामुळे मी सध्या बाहेर फिरत नाही अशी कोपरखळी मारून, योग्य वेळेस मी नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले. 

    फलटण नगर परिषदेची सत्ता आपण स्वतः नगराध्यक्ष असल्यापासून गेली ३० वर्षे फलटणकरांनी आपल्याकडे सोपविली, सलग सत्तेचा एवढा प्रदीर्घ कालावधी यापूर्वी कोणालाही लाभला नसल्याचे निदर्शनास आणून देत त्या विश्वासाला कोठेही तडा जाऊ न देता यापुढेही आपण शहर विकास आणि नागरी सुविधांच्या अधिक सक्षमी करणाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

    फलटण हे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, फलटण शहरातील जुन्या वास्तूंची पुनर्स्थापना टप्प्याटप्प्याने होणार आहे. श्रीमंत रामराजे यांनी पाणी प्रश्नांचा ध्यास घेतला, तो यशस्वी करून, फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडवला.  तसेच फलटण शहर हे आधुनिक काळातील शहर बनवण्याचा ध्यासही महाराज साहेबांनी घेतला आहे, त्याची सुरवात झाली आहे. शहरात पाण्याची कमतरता असताना, नवीन साठवण तलाव करून पाण्याचा प्रश्न सोडवला, गटार योजना, रस्ते, विकास कामे पूर्ण होत आहे, प्रमुख गरजा पूर्ण केल्या आहेत, आता फलटण शहर स्वच्छ व सुंदर बनवून आदर्श शहर बनविण्यासाठी  महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू असल्याचे आ. दिपकराव चव्हाण यांनी सांगितले.

    शंकर मार्केट येथील 'मंडई गणपतीची आरती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडली. तद्नंतर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे अनावरण ना. श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते  संपन्न झाले. ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी लिहिलेले विशेष मानपत्र देवून ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा नागरी सत्कार यावेळी प्रभागातील नागरिकांच्यावतीने करण्यात आला. नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व सौ. प्रगतीताई कापसे यांचाही मानपत्र देवून ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, अरविंद मेहता, शामराव अहिवळे, दिगंबर देशपांडे, तात्यासाहेब जराड, प्रा. रमेश आढाव, स.रा. मोहिते यांचा  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

    ज्येष्ठ पत्रकार  रविंद्र बेडकिहाळ यांनी प्रास्तविकात शंकर मार्केट सुशोभीकरणाबद्दल धन्यवाद देत त्यामध्ये आणखी काही गोष्टी समाविष्ट करुन सुशोभीकरण अधिक चांगले करण्याची मागणी केली. 

    नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व सौ. प्रगतीताई कापसे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद रणवरे यांनी केले.

No comments