Breaking News

आणखी ४ ते ५ जागा वाढवा आणि फलटण नगरपालिका जिंका - चंद्रकांतदादा पाटील

Increase 4 to 5 more seats and win Phaltan Municipality - Chandrakantdada Patil

रणजितसिंह यांचा भव्य सत्कार करण्यास मी आतुर - चंद्रकांतदादा पाटील

    फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा) -  वारकरी संघटना कार्यालय, वारकरी निवास व अद्यावत संपर्क कार्यालय उभारल्याबद्दल मी खासदार रणजितसिंह यांचे अभिनंदन करतो, माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह यांचा कामाचा धडाका पाहून, सातारा लोकसभेतही रणजितसिंहच  खासदार हवेत अशी मागणी होऊ लागली आहे. अशा या कर्तबगार खासदाराचा फलटणमध्ये भव्य सत्कार करण्याची संधी मी पाहत आहे. आगामी काळामध्ये अशी संधी लवकरात लवकर मिळो, त्याआधी मला आगामी नगरपालिका निवडणूकीनंतर तुम्हा सर्वांचा सत्कार करण्याची संधी मिळेल असे वाटते, नगरपालिकेत आपल्या आणखी ४ ते ५ जागा वाढवा आणि फलटण नगरपालिका जिंका. फलटण तालुक्यामध्ये आगामी होणाऱ्या सर्वच निवडणूका भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ताकतीने लढवून, फलटण तालुक्यावर भारतीय जनता पार्टीची सत्ता आणावी असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. 

    फलटण तालुका व शहर भाजपा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते  व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. ०७ डिसेंबर २०२१ रोजी  सदरभाई मेटकरी कॉम्प्लेक्स, शिंगणापूर रोड, फलटण येथे संपन्न झाले.  यावेळी  चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार जयकुमार गोरे, आ. समाधान आवताडे, भाजपा सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश....
  यावेळी देवा पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे बेरोजगार सेलचे प्रदेश सचिव प्रसाद पवार-पाटील, बांधकाम व्यावसायिक सागर शहा, भटक्या विमुक्त जाती जमातीचे जिल्हाउपाध्यक्ष अनिल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते जमिल आतार, उमेश पवार, संजय जाधव आदींनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. 

    पुढे बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यामधील महाविकास आघाडीचे सरकारमध्ये असलेली नेतेमंडळी खुर्ची टिकविण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. त्यामध्ये संजय राऊत हे डबल ढोलकी आहेत. संजय राऊत हे मुंबईमध्ये ममता बॅनर्जी आल्या की, त्यांच्या सारखे बोलतात तर दिल्ली मध्ये सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी जरा डोळे वटारले की, लगेच त्यांच्यासारखे बोलतात. आपल्या राज्याचे  मुख्यमंत्री गेल्या दोन वर्षांपासून मंत्रालयात गेले नाहीत ते आता केंद्राचे नेतृत्व करायला निघाले आहेत, आमच्या जीवावर 18 खासदार निवडून आलेले कसली स्वप्न पाहत आहेत असा सवालही  भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे,  बजरंग गावडे (छाया - अमित साळुंखे)
     संपर्क कार्यालय हा भारतीय जनता पार्टीचा आत्मा आहे. सदर कार्यालयातुन पक्ष चालतो, आंदोलने चालतात, कार्यालयाच्या माध्यमातून  जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यात येत असतात,  खासदार रणजितसिंह यांनी अत्यंत आधुनिक व अद्यावत असे संपर्क कार्यालय फलटण येथे उभारले आहे, त्याबद्दल पक्षाच्यावतीने मी त्यांचे अभिनंदन करतो, व फलटण संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नक्कीच अधिक लोकसंपर्क आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक याला प्राधान्य राहिल अशी ग्वाही देतानाच,संपर्क कार्यालय केवळ सुरु होऊन उपयोग नाही, तर कार्यालय जिवंत ठेवणे गरजेचे आहे. कार्यालय हे ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वानांच प्रेमळ वाटले पाहिजे. कार्यकर्त्यांनी पुढच्या नागरिकांचे अडचण ऐकून लिहून घेतली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी आ. पाटील यांनी व्यक्त केली.

    नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान आपल्या देशाला पुन्हा मिळणे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा, समस्यांचा अगदी बारकाईने विचार केला आहे. त्यांच्यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या योजना आणून त्यांची यशस्वीपणे अंमलबजावणीही केली, मोदींजींनी सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी खूप बारकाईने नियोजन केले आहे. २०२४ पर्यंत देशातील शेवटच्या घरापर्यंत नळ कनेक्शनद्वारे पाण्याचा पुरवठा होईल याची खात्री देत केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती आ. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

अनुप शहा भावी नगराध्यक्ष : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील 
फलटण नगर परिषदेमध्ये खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सत्तांतर होईल. त्यावेळी नगरसेवक, विरोधी पक्ष नेते असा प्रवास केलेले आमचे अनुप शहा हे नगराध्यक्ष नक्कीच होतील, अशी खात्री सुद्धा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

    विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राज्यभरात जेवढे फिरतात त्याच्या एक टक्काही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे फिरत नाहीत. कोरोनामध्ये राज्याला सर्वतोपरी मदत केंद्र सरकारनेच केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या जीवावर १८ खासदार निवडून आलेली, केंद्रात नेतृत्व करण्याची स्वप्न पाहत आहेत. गेल्या वर्षा दोन वर्षांमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात व वर्षा बंगल्यावर सुद्धा गेले  नाहीत आणि ते आता केंद्राचे नेतृत्व करायला निघाले आहेत, असा टोलाही यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

    शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये कार्यालय सुरु करणे ही आमची सर्वांची इच्छा होती, त्याप्रमाणे आपण सुरु केलेल्या कार्यालयाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी उद्घाटन केले याचाच आम्हाला मोठा आनंद असल्याचे नमूद करीत आज ज्यांचे भाजपा प्रवेश झाले त्या सर्वांचे भाजपा मध्ये स्वागत करतानाच फलटण तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांना एकत्र बसून सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदरील कार्यालय सुरु केले आहे. फलटण तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत पंतप्रधान मोदींचा विचार आणि त्यांच्या लोकहितकारी योजना पोहोचविण्यासाठी ह्या कार्यालयाच्या माध्यमातून कामकाज होणार असल्याची ग्वाही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.

    माढा लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या शेवटच्या कार्यकर्त्यामुळे आपण खासदार झालो आहे. गोरगरीब नागरिकांना न्याय देण्यासाठी आपण कार्यरत राहणे गरजेचे आहे. पक्षाचा कार्यकर्ता कधीही पगारी नसतो. त्यामुळे त्याला योग्य तो मान सन्मान आपण ह्या कार्यालयाच्या माध्यमातून देवून कामकाज करीत राहणार असल्याची ग्वाही देत नगर पालिकेतील बऱ्याच बुरुजाच्या भिंती आपण तोडलेल्या आहेत, आगामी काळामध्ये नगर पालिकेमध्ये सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही. हाच नाईक निंबाळकर फलटणची घडी व्यवस्थित बसवणार असल्याची खात्री खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.

    या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, विश्वासराव भोसले, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर,  शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगर परिषदेतील विरोधी पक्ष गटनेते अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, अनुप शहा, बाळासाहेब कदम, नानासो इवरे, धनंजय पवार, राजेंद्र काकडे, बाळासाहेब काशीद, वसीम मणेर, भाजपचे नगरसेवक/नगरसेविका आणि अन्य पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे यांनी केले. तर आभार सुशांत निंबाळकर यांनी मानले.

No comments