11 डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
सातारा (जिमाका) : सातारा मुख्यालयात आणि जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयात दि.११ डिसेंबर,२०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्व प्रकारचे दिवाणी दावे व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. सातारा जिल्हा न्यायालयात लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम.जे. धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या लोक अदालतीत धनादेश न वटलेली प्रकरणे, वादपूर्व प्रकरणे, मोटार अपघात दावे, थकीत कर्जाची प्रकरणे, वैवाहिक वाद, थकीत ग्रामपंचायतीची मालमत्ता कर व पाणी बिलाची प्रकरणे इत्यादी सर्व प्रकरणांचा समावेश आहे. येत्या लोकअदालतीमध्ये न्यायाधीश, पॅनेल विधिज्ञ, सरकारी वकील, इत्यादी तडजोड घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणार आहेत. तरी सर्व पक्षकारांनी जास्तीत जास्त संख्येने संबंधित न्यायालयात सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती तृप्ती नि. जाधव आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुखदेव पाटील यांनी केले आहे.
लोकन्यायालयाचे फायदे: खटल्यामध्ये साक्षी-पुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात, निकाल झटपट लागतो. लोकन्यायालयाच्या निवाड्याविरुध्द अपील नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. लोकन्यायालयाचा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने ना कोणाचा जय होतो ना कोणाची हार होते त्यामुळे निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकात द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणारे निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. वेळ आणि पैसा दोन्हींचीही बचत होते व लोक न्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणामध्ये कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत मिळते.
No comments