पंतप्रधान साधणार बुडीत बँकांच्या ठेवीदारांशी संवाद ; सातारा येथे संवादाची व्यवस्था
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ डिसेंबर - सामान्य जनतेने मोठ्या कष्टाने जमा केलेली रक्कम बँकेत ठेव स्वरूपात ठेवली जाते. मात्र आता अनेक नागरी सहकारी बँका अडचणीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा बँकांमधील पैसे/ठेवी परत मिळवताना ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते व अशी रक्कम DICGC विम्यातून परत मिळवताना मोठा कालावधी जात असे.
परंतु केंद्र सरकारने DICGC कायद्यामध्ये बदल करून, तो दिनांक 4 फेब्रुवारी 2020 पासून लागू करण्यात आला आहे. यामुळे सर्व नागरी सहकारी बँका, सहकारी बँका, खाजगी बँका तसेच विदेशी बँकांच्या भारतामधील शाखांमध्ये असलेल्या ठेवींची हमी या कायद्यातील तरतुदींनुसार प्रति ग्राहक रु. 5,00,000/- (रु. पाच लाख) पर्यंत रक्कमेची हमी DICGC (डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन) घेईल.
वरील प्रमाणे बदल असलेला कायदा (DICGC Bill 2021) संसदेने संमत केला आहे व दिनांक 01/09/2021 पासून अंमलात आणला आहे. तसेच सदर रक्कम बँक अडचणीत आल्यापासून 90 दिवसांचे आत खातेदाराला मिळणार आहे. या कायद्यानुसार दिनांक 01/09/2021 पासून देशातील निर्बंध असलेल्या 16 नागरी सहकारी बँकांच्या सुमारे एक लाख खातेदारांना याचा लाभ झाला आहे. या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांशी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी दिनांक 12/12/2021 रोजी दुपारी 12.00 वाजता वेबकास्ट द्वारे संवाद साधणार आहेत. या संवादाची व्यवस्था देशातील एकूण 18 ठिकाणी विविध बँकांचे माध्यमातून केली असून अशीच ऑनलाईन संवाद सभा बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे दिनांक 12/12/2021 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद सातारा येथे करण्यात आली आहे.
सदर सभेमध्ये विविध बँकांचे ठेवीदार यांना आमंत्रित करण्यात आले असून मा. पंतप्रधान यापैकी काही लाभार्थ्यां सोबत ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रत्यक्ष संवाद साधतील. या कार्यक्रम प्रसंगी मा. श्री. देवसिंह चौहान, केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री, हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून ते सर्व लाभार्थींना मार्गदर्शन करणार आहेत.
तरी आयोजक सातारा जिल्ह्याची अग्रणी बँक, बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे श्री युवराज पाटील जिल्हा अग्रणी व्यवस्थापक यांनी या योजनेच्या लाभार्थींना तसेच इतर सर्व ठेवीदारांना सदर कार्यक्रमास दिनांक 12/12/2021 रोजी सकाळी 10.00 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, सातारा येथे उपस्थित राहण्याबाबत आवाहन केले आहे.
No comments