साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात; मंत्री छगन भुजबळ यांनी केली संमेलन स्थळाची पाहणी
नाशिक (जिमाका वृत्त ) :- कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आहे. या साहित्य संमेलन कार्यक्रमास पावसामुळे कुठलाही व्यत्यय निर्माण होणार नाही या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली.
कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्यात असून संमेलन स्थळी सुरू असलेल्या कामांची स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांनी आज पाहणी केली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संमेलनाच्या नियोजनाबाबत माहिती दिली.
यावेळी संमेलन समन्वयक समीर भुजबळ, कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर,प्राचार्य प्रशांत पाटील,जयवंतराव जाधव, रंजन ठाकरे, दिलीप खैरे, स्वप्नील पाटील, समाधान जेजुरकर आदी उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, सकाळपासून पाऊस जरी सुरू झाला असला तरी आवश्यक ती खबरदारी आपण घेतलेली आहे. पावसामुळे कुठलाही व्यत्यय येणार नाही यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसेच कार्यक्रमात कुठलेही बदल केले जाणार नाही. मुख्यमंडप हा पावसापासून पूर्ण संरक्षण होईल या पद्धतीने उभारण्यात आला आहे. त्यामुळे कार्यक्रमस्थळी कुठलीही अडचण होणार नाही. केवळ जे कार्यक्रम आपण खुल्या व्यासपीठावर घेणार होतो ते कार्यक्रम इतर ठिकाणी हलविण्यात आले आहे. याठिकाणी पहिल्या पेक्षा अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
तसेच जास्तीत जास्त नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच पाऊस सातत्याने सुरू राहिल्यास मंडपाच्या दोन्ही बाजूने चर खोदून पाणी जाण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी संमेलन स्थळी सुरू असलेल्या सर्व कामकाजाची पाहणी करून कार्यक्रम स्थळी उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या. तसेच हे साहित्य संमेलन सर्व नाशिककरांचे असून सर्वांना मोफत प्रवेश आहे. नाशिककरांनी मोठ्या संख्येने संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
कार्यक्रमस्थळी करण्यात आलेले फेरनियोजन….
बालसाहित्य मेळावा – मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या जागेत
कवी कट्टा – कॉलेज कँटीन जागेत
गझल कट्टा – सेमिनार हॉल
माझ्या जीवीची आवडी
दि.२ डिसेंबर २०२१ रोजी संमेलनाच्या पूर्व संध्येला सायंकाळी ५ वाजता ‘माझे जीवाची आवडी’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कवी संदीप खरे, संगीतकार सलील कुलकर्णी, गायक हृषीकेश देशपांडे, विभावरी आपटे जोशी, शरयू दाते, शुभंकर कुलकर्णी तर काव्यवाचन चिन्मयी सुमित, विभावरी देशपांडे करणार आहे. या कार्यक्रमात देखील नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
No comments