प्लास्टिकचा वापर बंद करा अन्यथा २५ हजारापर्यंत दंड व कारावास - मुख्याधिकारी संजय गायकवाड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ११ डिसेंबर - सुधारित प्लॉस्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०२१ नुसार, ७५ मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या सर्व प्रकारच्या प्लॉस्टिक साहित्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. शासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिक साहित्याचा वापर, साठवणूक करु नये असे आवाहन फलटण नगर परिषदेमार्फत, करण्यात आले आहे. शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक साहित्याचा वापर, वाहतूक किंवा साठवणूक केली तर महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) नियम २००६ अंतर्गत महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्मोकोल अधिसूचना २०१८ चे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी जाहीर केले आहे.
नगर परिषद फलटण हद्दीतील सर्व दुकाने / संस्था / आस्थापना / मार्केट संघटना / कार्यालये व व्यक्तींना सूचित करण्यात येते की, केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट २०२१ मध्ये अधिसूचित केलेल्या सुधारित प्लॉस्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०२१ नुसार खालील एकल वापर (सिंगल युज), प्लॉस्टिक वस्तू प्रतिबंधित आहेत, तसेच ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या सर्व प्रकारच्या प्लॉस्टिक साहित्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. सजावटीसाठी प्लॉस्टिक व पॉलिस्टीरीन (थर्मोकोल) मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकिटे, प्लॅस्टिकच्या काड्यासह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लॉस्टिकच्या काड्या, प्लॉस्टिकचे झेंडे, कैंडी कांड्या व आईसक्रीम कांड्या, प्लेटस, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टीरर्स) प्लॅस्टिक किंवा पीव्हीसी बॅनर (१०० मायक्रॉनपेक्षा कमी) याबरोबरच महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्मोकोल अधिसूचना २०१८ अंतर्गत खालील गोष्टी प्रतिबंधित आहेत.
कम्पोस्टेबल प्लॅस्टिक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून), सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्स), हँडल असलेल्या व नसलेल्या डिश बाउल व कैटेनर (डबे). शासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिक साहित्याचा वापर,वाहतूक व साठवणूक करु नये, अन्यथा महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) नियम २००६ अंतर्गत महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्मोकोल अधिसूचना २०१८ चे उल्लंघन केल्यास खालील प्रमाणे दंड आकारणी करण्यात येईल.
पहिला गुन्हा करणाऱ्यास रु.५०००/- (पाच हजार रुपये) दंड करण्यात येईल.
दुसरा गुन्हा करणाऱ्यास रु.१००००/- (दहा हजार रुपये) दंड करण्यात येईल.
तिसरा गुन्हा करणाऱ्यास रु.२५०००/- (पंचवीस हजार रुपये) दंड व तीन महिन्याह कारावास अशी शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली असल्याचे फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी जाहीर केले आहे.
No comments