हातभट्ट्या आणि बनावट दारू निर्मिती व विक्रीविरोधात धडक कारवाई करा – गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई
मुंबई, दि. 2 : राज्यातील हातभट्ट्या आणि बनावट दारू निर्मिती व विक्री करणाऱ्याविरोधात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे धडक कारवाई करण्याचे निर्देश गृह, (ग्रामीण) राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री श्री. शंभुराज देसाई यांनी दिले.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध विषयांच्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री यांच्या दालनात आढावा बैठक झाली.
या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्री. कांतीलाल उमाप, उप सचिव श्री. युवराज अजेटराव, सहआयुक्त यतिन सावंत आदी उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री श्री. देसाई यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागातील प्राप्त महसूल, रिक्त पदे व पद भरती तसेच अवैध दारू निमिर्ती व विक्री विरोधात विभागाकडून करण्यात येणाऱ्या कारवाई बाबतचा आढावा घेतला.
सन 2021-22 या वर्षात नोव्हेंबरअखेर रू. 9662.02 कोटी इतका महसूल या विभागाकडून प्राप्त झाला असून तो शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या 49.55% इतका आहे. महसूल उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अवैध दारू निर्मिर्ती व विक्री थांबविणे आवश्यक असल्याचेही राज्यमंत्री देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश राज्यमंत्री श्री. शंभुराज देसाई यांनी यावेळी दिले.
No comments