Breaking News

सातारा जिल्ह्यात ७७०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अवकाळीचा फटका

Untimely impact on crops on 7705 hectare area in Satara district

     फलटण   : अवकाळी पाऊस, बदलते हवामान यामुळे सातारा जिल्ह्यातील पिके, फळबागा व अन्य नुकसानीची पाहणी करुन प्रत्यक्ष पंचनामे करण्यात येत आहेत, दरम्यान प्राथमिक पाहणी नुसार जिल्ह्यातील ५१३ गावातील ७७०५ हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी, भात, मका, हरभरा गहू, स्ट्रॉबेरी, बटाटा, घेवडा, भाजीपाला, कांदा, टोमॅटो, द्राक्षे, डाळिंब बागा वगैरे पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक पाहणीतील नजर अंदाजानुसार दिसून येत असून प्रत्यक्ष पंचनामे झाल्यानंतर यामध्ये कमी जास्त प्रमाणात बदल होऊ शकतो असे मत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी कळविले आहे.

    सदर नजर अंदाजानुसार व प्राथमिक पाहणी नुसार सातारा तालुक्यात ४३ गावातील ७१ हेक्टर, कोरेगाव तालुक्यात ९३ गावातील १७८०.५५ हेक्टर, खटाव तालुक्यात ८३ गावातील १३०८.४५ हेक्टर, महाबळेश्वर तालुक्यात ३४ गावात ४५०.९ हेक्टर, वाई तालुक्यात ७९ गावात ३०७.९ हेक्टर, जावली तालुक्यात २४ गावात २६ हेक्टर, फलटण तालुक्यात २२ गावात ८० हेक्टर, माण तालुक्यात ९८ गावात ३६९१.४५ हेक्टर, कराड तालुक्यात १९ गावात ४७.५ हेक्टर आणि पाटण तालुक्यात १८ गावात १२.५ हेक्टर क्षेत्रावरील वर उल्लेखिलेल्या विविध पिकांचे नजर अंदाजानुसार नुकसान झाल्याचे दिसते, प्रत्यक्ष पंचनामे सुरु असून त्यानंतर नुकसानीची निश्चित माहिती उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी कळविले आहे.

No comments