Breaking News

निकोप हॉस्पिटल कडून मोफत बुस्टर डोस व पत्रकारांना मोफत उपचार

  Free booster dose and Free treatment for journalists from Nikop Hospital 

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ जानेवारी : कृष्णामाई मेडिकल अँड रिसर्च फौंडेशन संचलीत निकोप हॉस्पिटल, फलटण यांच्यावतीने प्रजासत्ताक दिन आणि पत्रकार दिनाच्या निमित्ताने फ्रंट लाइन वर्कर प्रामुख्याने सैन्य दलातील व्यक्ती, पोलीस अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्सेस व अन्य कर्मचारी आणि पत्रकारांसाठी १ हजार बुस्टर डोस (progresiv Dos) मोफत देण्याची तसेच पत्रकारांना वैद्यकीय उपचार सुविधा मोफत देण्याची घोषणा हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. जे. टी. पोळ यांनी केली आहे.

   प्रतीवर्षाप्रमाणे पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. जे. टी. पोळ बोलत होते. यावेळी निष्णात दंत विकार तज्ञ डॉ. विश्वराज निकम, डॉ. अभिनया राऊत, प्रशासन व जनसंपर्क अधिकारी संदीपकुमार जाधव उपस्थित होते.

 वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने लसीकरण करुन घेणे,आवश्यक असल्याने ज्या पत्रकारांनी अद्याप दुसरा डोस घेतला नाही त्यांनी आणि ज्यांचा दुसरा डोस घेऊन ९ महिने झाले आहेत त्यांनी बुस्टर डोस (Progresiv Dos)घेणे आवश्यक आहे. खाजगी हॉस्पिटल मध्ये प्रति डोस ७८५ रुपये आकारण्यात येत आहेत, तथापी आपण वरीलप्रमाणे १००० डोस मोफत देणार आहोत, त्याचप्रमाणे पत्रकार व त्यांचे कुटुंबीय (पत्नी व मुलांची) संपूर्ण वैद्यकीय तपासणी मोफत करुन त्यांचे वैद्यकीय अहवाल (Health Card) तयार करुन देणार असल्याचे डॉ. जे. टी. पोळ यांनी जाहीर केले.

     गेली ३०/३५ वर्षे फलटण सह शेजारच्या माण, खटाव, खंडाळा तालुक्यातील सर्व प्रकारच्या आजारात रुग्णांना वेळेत आणि सामाजिक बांधीलकी जपत वैद्यकीय सेवा देताना आपण सुसज्ज इमारत, अगदी सी. टी. स्कॅन पासून कॅथलॅब पर्यंत, एक्सरे पासून सोनोग्राफी पर्यंत, टूडी इको पासून सर्व साधने सुविधा, उत्तम दर्जाची पॅथलॅब इथे असून तसेच एममारआय सुविधा आणि तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स, प्रशिक्षीत नर्सिंग व अन्य कर्मचारी येथे एका छताखाली उपलब्ध आहे, त्याशिवाय शासनाच्या म. फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत व अन्य योजना, विविध विमा कंपन्यांसाठी कॅशलेस व अन्य सुविधा येथे उपलब्ध असल्याने रुग्ण व नातेवाईकांची सर्व सोय येथे पाहिली जात असताना योग्य निदान, दर्जेदार उपचार सुविधा येथे उपलब्ध असल्याचे डॉ. जे. टी. पोळ यांनी निदर्शनास आणून दिले.

   पत्रकारांसाठी आतापर्यंत सवलतीच्या दरात दिली जाणारी वैद्यकीय उपचार सुविधा मोफत देण्याची घोषणा यावेळी डॉ. जे. टी. पोळ यांनी पत्रकारांच्या मागणीनुसार केली आहे.

No comments