फलटणचे डॉ. अनिल कुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्कार
फलटण : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिन पूर्वसंध्येला भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारे पद्मविभूषण, पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये महाराष्ट्रातून फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेचे विद्यमान संचालक डॉ. अनिल कुमार राजवंशी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
फलटणमध्ये यापूर्वी 'उपरा'कार लक्ष्मण माने, कृषीतज्ञ स्व. बी. व्ही. निंबकर यांच्यानंतर डॉ. अनिल कुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे फलटणच्या वैभवात भर पडली आहे.
डॉ. अनिल कुमार राजवंशी यांचा जन्म लखनऊ येथे झाला. त्यांनी आय. आय. टी. कानपूर येथून अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेतले आणि त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ फ्लॉरिडा येथून पी एच डी प्राप्त केली व काही काळ तिथे अध्यापनाचे काम केले. त्यानंतर आपल्या देशातील लोकांसाठी काम करण्याच्या ओढीने ते भारतात परतले आणि सातारा जिल्ह्यातील फलटण येथे स्थायिक झाले.
१९८१ पासून ते फलटण येथे निंबकर कृषी संशोधन संस्थेचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. ही संस्था शेती, ऊर्जा आणि पशुसंवर्धन संशोधनासाठी नावाजलेली आहे.
डॉ. राजवंशी यांना अक्षय ऊर्जा आणि ग्रामीण शाश्वत विकास क्षेत्रातील संशोधनाचा ३५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांच्या नावावर १५० हून अधिक प्रकाशने आणि ७ पेटंट आहेत. सौरऊर्जा आणि ग्रामीण विकास कार्यासाठी डॉ. राजवंशी यांचा सोलर हॉल ऑफ फेम (१९९८) मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांना २००१ मध्ये जमनालाल बजाज पुरस्कार , २००२ मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) पुरस्कार आणि २००४ मध्ये AIR श्रेणीतील एनर्जी ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. २००९ मध्ये त्यांना शाश्वत संशोधनासाठी ग्लोब पुरस्कार मिळाला आणि २०१४ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठाकडून प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय ठरले.
त्यांच्या या निवडीबद्दल विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, प्रगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झीया कुरेशी, त्यांच्या सुविद्य पत्नी, भारतातील कृषी वैज्ञानिक आणि सध्या निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नंदिनी निंबकर, डॉ. मंजिरी निंबकर, डॉ. चंदा निंबकर, कमला निंबकर बालभवनचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, विद्यार्थी, निंबकर कृषी संशोधन संस्थेचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी त्यांचे सहकारी मित्र, परिवार या सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments