बंधन बँकेच्या अधिकाऱ्याने केला दरोड्याचा बनाव ; बँकेच्या पैशावर मारला डल्ला!
संशयीत आरोपींसमवेत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. २४ फेब्रुवारी - दोन मोटार सायकलींवरुन आलेल्या चौघाजणांनी पाठलाग करुन, डोळ्यात चटणीची पुड टाकुन ७३,४६५/- रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली असल्याचा खोटा बनाव करून, फलटण येथील बंधन बँकेच्या गोळा केलेल्या कर्जाच्या हप्त्यांची ७३,४६५/- रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी, बंधन बँकेच्या अधिकार्यासह त्याच्या मित्राच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान तक्रारदार बँक अधिकाऱ्याने तक्रार देताना सांगितलेल्या घटनेत तफावत आढळून असल्याने, फलटण ग्रामीण पोलिसांनी, पोलिसी खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता, अधिकाऱ्याने मित्राच्या साहायाने दरोड्याचा बनाव केल्याचे कबुल केले.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, बंधन बँक लि. शाखा - फलटण या बँकेमध्ये रिलेशनशिप ऑफिसर म्हणून नोकरीस असलेले समाधान भिमराव वजाळे वय २३ वर्ष, सध्या रा. स्वामी विवेकानंदनगर, बी. एस. एन. एल. ऑफिसच्यासमोर बंधन बँक रेसिडन्स, फलटण, ता. फलटण, जि. सातारा मुळ रा. माळीनगर, अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांनी दि. २२/०२/२०२२ रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार दिली की, दि. २२/०२/२०२२ रोजी दुपारी १.१५ वा. चे सुमारास ते बंधन बँकेच्या कलेक्शनचे ७३,४६५/- रुपये घेऊन अलगुडेवाडीहुन गोखळी गावच्या दिशेने जात असताना दोन मोटार सायकलींवरुन आलेल्या चौघाजणांनी त्यांचा पाठलाग करुन खटकेवस्तीजवळील चव्हाणपाटी येथे गाठुन त्यांच्या डोळ्यात चटणीची पुड टाकुन त्यांचेकडील ७३,४६५/- रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली आहे. समाधान भिमराव वजाळे यांनी वरीलप्रमाणे हकिकत सांगितल्यावर त्यांचे तक्रारीवरुन फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गु. र. नं. १२२ / २०२२ भा. दं. सं. कलम ३९४, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी स. पो. नि. अक्षय सोनवणे, स. पो. नि. दत्तात्रय दराडे व पो. उ. नि. सागर अरगडे यांचे नेतृत्वाखाली तीन पथके तयार करुन त्यांना तपासकामी सूचना देऊन रवाना केले.
पो. नि. मा. धन्यकुमार गोडसे सो यांच्या सूचनांनुसार तक्रारदार समाधान भिमराव वजाळे यांनी दाखविलेल्या घटनास्थळाला भेट देऊन तपासाची दिशा निश्चित करुन त्यादृष्टीने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु केला. त्यामध्ये तक्रारदार यांनी चोरट्यांनी त्यांचा ३ कि. मी. पर्यंत पाठलाग केल्याचे तक्रारीत सांगितले आहे. परंतु त्यांचे मोटार सायकलला आरसे नसल्याचे दिसून आले. यावरुन तक्रारदार काहीतरी लपवत असल्याचा संशय आल्यामुळे पुन्हा तक्रारदार यांचेकडे तपासामध्ये समोर आलेल्या वरील मुद्द्यांबाबत विचारपूस केली असता, तो उलटसुलट माहिती सांगु लागला. त्यावेळी त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देऊन सांगितले की, दि. २२/०२/२०२२ रोजी सकाळपासून दुपारपर्यंत बंधन बँकेच्या गोळा केलेल्या कर्जाच्या हप्त्यांची रोख रक्कम ७३,४६५/- रुपये हडप करण्याच्या दृष्टीने त्याचा गावाकडील मित्र महंम्मद हमीद नदीफ मोमीन वय २२ वर्ष, रा. कांतीगल्ली, अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापूर यास फलटणमध्ये बोलावुन घेतले होते. त्यानंतर दोघांनी दरोड्याचा बनाव करण्याचा प्लॅन केला. त्यामध्ये ठरल्यानुसार महंम्मद हमीद नदीफ मोमीन हा पैसे घेऊन गेल्यानंतर त्याने जवळच्याच एका गावातील किराणा दुकानातून चटणीची पुड विकत घेऊन ती स्वतःचे डोळ्यावर टाकल्याचा बनाव करुन फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस खोटी तक्रार दिली आहे.
प्रस्तुत गुन्ह्याचे तपासामध्ये तक्रारदार यांच्यासह त्यांचा साथीदार असलेल्या महंम्मद हमीद नदीफ मोमीन यास अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडुन गुन्हा करताना त्यांनी वापरलेले दोन मोबाईल हॅण्डसेट व एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरड़े यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, दत्तात्रय दराडे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस हवालदार दादासो यादव, मोहन काळे, शोभाताई खाडे, उर्मिला पेंदाम, पो. ना. वैभव सूर्यवंशी, अमोल जगदाळे, रुपाली भिसे व गणेश अवघडे यांनी केली आहे.
No comments