फलटण येथे विविध खेळांसाठी सुसज्ज असणार्या क्रीडा संकुलाची उभारणी सुरु : आ. दिपकराव चव्हाण
फलटण : फलटण तालुका क्रीडा संकुलासाठी महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून ५ कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध झाला असून आणखी निधीची तरतूद करुन येथे विविध खेळांसाठी सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे, या क्रीडा संकुलामधून उच्च दर्जाचे अनेक खेळाडू तयार होतील आणि फलटण तालुक्याचा क्रीडा क्षेत्रातील नावलौकिक वाढवतील असा विश्वास आ. दिपकराव चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
फलटण येथील मुधोजी क्लब क्रीडांगणावर युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात विशेष अतिथी म्हणून आ. दीपक चव्हाण बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी नगरसेविका सौ. प्रगती कापसे, सौ. वैशाली चोरमले, सौ. दिपाली निंबाळकर, सौ. जोत्स्ना शिरतोडे, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या खजिनदार सौ. मंगल घाडगे, प्रितम लोंढे पाटील, सौ. सोनाली बेडके, अमरसिंह खानविलकर, राम नाईक निंबाळकर आदी मान्यवरांसह क्रीडा प्रेमी फलटणकर उपस्थित होते.
फलटण तालुक्याला हॉकी, खो खो, कबड्डी, हुतूतू, कुस्ती वगैरे देशी खेळांची मोठी परंपरा लाभली असून खो खो क्षेत्रात तर आजही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू फलटणचे नाव उंचावत असल्याचे निदर्शनास आणून देत मुधोजी क्लबच्या माध्यमातून अद्ययावत बॅडमिंटन हॉल उभारण्यात आला आहे, येथे राज्य व जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी आ. चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
खो खो प्रमाणेच आजही कुस्ती, हॉकी व बास्केटबॉल मध्ये फलटणचे खेळाडू आघाडीवर असून राज्य व राष्ट्रीय स्तरावर फलटणचा नावलौकिक वाढवीत असल्याचे नमूद करीत आगामी काळात तालुका क्रीडा संकुलाच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देताना त्यांना आवश्यक साधने, सुविधा उपलब्ध करुन देवून विविध खेळात फलटण मधून दर्जेदार खेळाडू मोठ्या संख्येने तयार होतील यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहणार असल्याचे आ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी स्पर्धेचे संयोजक तथा माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मुधोजी क्लब बास्केटबॉल मार्गदर्शक बाळासाहेब बाबर, पै. भास्कर ढेकळे, विजय जाधव, फारुख मुल्ला, मुन्ना शेख, अनिल तेली, निकम सर, अजिंक्य बेडके, यादव, श्रुती डोंगरे उपस्थित होते.
No comments