भारतीय महिला हॉकी संघात वाखरीच्या अक्षता ढेकळेचा समावेश
फलटण दि. २३ : हॉकी इंडिया कडून स्पेन विरुद्धच्या FIP प्रो लीग स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघ जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये वाखरी, ता. फलटण येथील अक्षता आबासाहेब ढेकळे या ग्रामीण खेळाडूचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय संघात फलटणच्या खेळाडूच्या समावेशाने फलटणच्या क्रीडा विशेषतः हॉकी क्षेत्रात आनंदोत्सव सुरु आहे.
भारतीय महिला हॉकी संघाची २२ सदस्यीय यादी हॉकी इंडियाने सोमवारी जाहीर केली. हा भारतीय महिला संघ प्रो लीग मध्ये भुवनेश्वर (ओडिसा) येथे स्पेन विरुद्ध आणि मायदेशात होणाऱ्या सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करेल. सदर सामने दि. २६ व २७ फेब्रुवारी रोजी होणार आहेत.
भारतीय संघाचे नेतृत्व दिग्गज गोलकीपर सविता करणार असून उप कर्णधार दीप ग्रेस एक्का असेल. या भारतीय महिला संघामध्ये एक नवा तरुण चेहरा म्हणून झारखंडची सविता कुमारी जिने ज्युनिअर इंडिया कडून आपली वेगळी छाप पाडली आहे, तिचा समावेश करण्यात आला आहे.
स्पेन विरुद्धच्या दुहेरी हेडरसाठी २२ सदस्यीय महिला संघात सविता सह विचू वेळी खारीबम आणि रजनी इतिमारपू यांचा सहभाग आहे. बचाव पटूमध्ये दीप ग्रेस एक्का, गुरुजीत कौर, निक्की प्रधान, उदिना इशिका चौधरी तर मिड फिल्डर मध्ये निशा, सलीमा हेटे, सलीमा चानू पुक्रबम, ज्योती, मोनिका, नेहा, नवज्योत कौर आणि नमिता रोप्पो यांची निवड करण्यात आली आहे.
फॉरवर्ड लाईन मध्ये अनुभवी वंदना कटारिया, शर्मिला देवी, नवनीत कौर, लालरे मसियामी, संगीता कुमारी आणि राजविंदर कौर असतील.
याशिवाय रस्मिता मिस, अक्षता आबासाहेब ढेकळे, सोनिका मारियाना कुजूर आणि ऐश्वर्या राजेश चव्हाण यांना डबल हेडरसाठी स्टॅण्ड बाय म्हणून नियुक्त केले आहे.
संघ निवडीबद्दल बोलताना भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक जेनेक शॉपमन म्हणाले, आम्ही आमच्या घरच्या सामन्यांमध्ये स्पेन विरुद्ध खेळण्यास उत्सुक आहोत. ओमानहुन परतल्यानंतर आम्हाला दोन आठवडे चांगले प्रशिक्षण मिळाले आणि मला विश्वास आहे की, निवडलेल्या २२ खेळाडू स्पेन विरुद्ध खेळण्यास व आपले कर्तृत्व दाखविण्यास उत्सुक आहेत. जेंव्हा तुमच्याकडे खेळाडूंची मोठी संख्या असते तेंव्हा संघ निवडणे नेहमीच कठीण असते पण नवीन खेळाडू प्रगती करीत आहेत आणि उज्वल भविष्य दर्शवित आहेत, हे पाहिल्यानंतर आपल्याला आनंद होत आहे.
त्या पुढे म्हणाल्या, स्पेन हा एक मजबुत प्रतिस्पर्धी आहे, त्यांनी सातत्याने उच्च स्तरावर कामगिरी केली आहे. फक्त टोकियो मधील उपांत्य फेरीत ते थोडक्यात हुकले आहेत आणि गेल्या गेल्या विश्वचषकात त्यांनी कांस्यपदक जिंकले आहे. ते अत्यंत कुशल व जोरदार बचवातून खेळतात त्यामुळे त्यांच्या विरुद्ध आम्ही स्वतःचा वेग, कौशल्य आणि मजबुत संरक्षण वापरण्याचा विचार करत आहोत.
No comments