Breaking News

छत्रपती संभाजी महाराजांच्या आमरण उपोषणाला मराठा क्रांती मोर्चा फलटणचा जाहीर पाठिंबा

मराठा क्रांती मोर्चा फलटण च्या वतीने अधिकार गृह समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे  (छाया - यशवंत खलाटे पाटील)
Maratha Kranti Morcha Phaltan support to Sambhaji Maharaj's fast unto death

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ डिसेंबर - मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर प्रलंबित प्रश्ना संदर्भात छत्रपती संभाजी महाराज यांनी राज्य सरकारने हे प्रश्न ताबडतोब सोडवून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मुबंई येथे आझाद मैदानावर  आमरण उपोषण सुरू केले आहे.  या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून, आज मराठा क्रांती मोर्चा फलटणने फलटण येथील अधिकारगृहासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

    मराठा क्रांती मोर्चाने, जगाने प्रेरित व्हावे असे ५८ शिस्तबध्द मोर्चे काढून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.   राज्य सरकार व केंद्र सरकारच्या भांडणात एकमेकांवर जबाबदारी ढकलल्याने, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तसेच तरुणांसाठी सारथीच्या माध्यमातून आर्थिक मदत होत नाही, तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अनेक गोष्टी लक्षात आणून देऊनही आर्थिक मदत केली जात नाही, या निषेधार्थ व आरक्षण मिळावे यासाठी छत्रपती संभाजी महाराज हे आज मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण करीत आहेत, त्यांना पाठिंबा देऊन, राज्य सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा फलटण यांनी केली आहे.

     मराठा समाजाला आरक्षण लवकर दिले नाही तर मराठा समाजाच्या वतीने ठाकरे सरकारला धारेवर धरले जाईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चा फलटणने राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान यावेळी मराठा क्रांती मोर्चा फलटण च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,श्रीमंत मालोजीराजे (राजे साहेब) यांना अभिवादन केले व अधिकार गृहा समोर उपोषणाला सुरुवात केली आहे.

No comments