मराठीचा निष्क्रिय कर्मयोग - डॉ. मॅक्सीन बर्नसन
“ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येतो. हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’म्हणून साजरा करण्याचा निर्णय २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला. कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा शिरवाडकर यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान राहिले आहे. मराठी कवितेला एका वेगळ्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवले.म्हणून त्यांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या व मराठी भाषेच्या संशोधक,थोर भाषातज्ञ डॉ.मॅक्सीन बर्नसनयांचा एक लेख देत आहे.”
“नीरा आत्ताच गेली.लोणंद दहा मिनिटात येईल.”
मी गेली चोवीस वर्षे एस टीने प्रवास करत असल्यामुळे असले संवाद अनेकदा ऐकते.मात्र त्यातील वाक्यप्रचार मला अजूनही मजेशीर वाटतो. जणू काय आपण प्रवास करत नाहीच.घर बसल्या (बस, बसल्या) आपल्या डोळ्यासमोर टी.व्ही. सारखी गावांची ये - जा होत असते.मराठी भाषेत अशी उदाहरणे अपवादात्मक नसून प्रातिनिधीक आहेत,असे म्हटले तर वावगे होणार नाही. माणसे निष्क्रिय असून वस्तूंना एक प्रकारचा आक्रमक जिवंतपणा असतो. आपण रस्त्यावर चालत असताना काटा मोडतो, ठेच लागते हे मला समजू शकते,पण बागही लागते!
अशा वाक्यप्रचारांच्या मागे एक विशिष्ट तत्वसरणी आहे की काय अशी शंका येते. “मला दिसते, ऐकू येते, कळते, समजते, पटते, जमते, आठवते, खटकते, भीती वाटते, आनंद वाटतो, हसू येते”–यासारख्या वाक्यप्रचारांमध्ये व्यक्तिला निरनिराळे मानसिक अनुभव येतात. शारीरिक अनुभवाच्या बाबतीतही असेच वाक्यप्रचार असतात : आपल्याला भूक तहान लागते,मळमळते,ताप येतो,सर्दी येते,चक्कर येते. समजणे,आवडणे,पटणे,भूक लागणे यांसारख्या अनुभवांच्या बाबतीत व्यक्ती निष्क्रिय असते हे कदाचित वस्तूस्थितीला धरून असेल.मात्र मराठी भाषेत सामाजिक जीवनामध्ये ही अशी निष्क्रिय दिसून येते. वधू वर लग्न करीत नाहीत,त्यांचे लग्न होते. (याच्यात कोण कर्ती - माणसे असतील तर ते त्या नवरा नवरीचे आईबाप.)नंतर त्यांचे प्रेम निर्माण होते, त्यांना मुले होतात, नोकरी मिळते (किंवा मिळत नाही), संकटे येतात, महागाईमुळे परवडत नाही, यश किंवा अपयश येते, नावलौकिक मिळतो, आजारपण आणि म्हातारपण येते आणि शेवटी मृत्यू ही येतो. जीवनामध्ये माणसांनी भरपूर काबाडकष्ट करूनसुद्धा मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून व्यक्ती ही निष्क्रिय कर्मयोगी.
कर्तरि प्रयोग मराठी भाषेत अजिबात नसतो, असं नाही माणसे काम करतात, आंघोळ करतात, जेवण करतात, प्रेम करतात. पण भूतकाळामध्ये काय होते हे पहा : " त्यांनी काम केले, त्यांनी आंघोळ केली, त्यांनी जेवण केले, त्यांनी प्रेम केले." कर्ता कुठे गेला? क्रिया एकदा संपली की, क्रियापदाचा मोहरा कर्त्याला सोडून कर्माकडे वळतो.
इंग्रजी भाषा अगदी याच्या उलट. इंग्रजीत माणसे क्रिया करायला धडपडत असतात. ते see, hear, feel, think, like. सर्दी येण्याची वाट देखील न पाहता ते ती झेलण्याचा प्रयत्न करतात.("catch a cold") इंग्रजी वाक्यामध्ये कर्ता असण्याची गरज असते की, कर्ता नसला, तर एक नकली कर्ता बनवावा लागतो:
" It is raining", " it is snowing."
अशा उदाहरणांच्या आधारे आपण पूर्व पाश्चात्य तत्वज्ञानाबद्दल निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला, तर आपण हमखास फसणार. पुरावे पुरेसे मिळत नाहीत. तरी पण कधी कधी असे वाटते की, या मराठी वाक्यप्रयोगांद्वारे आपण एका प्राचीन विचारविश्वात डोकावू शकतो, जिथे सोबत न कर्ता, ना कर्म, क्रिया अधांतरीच राहतात.त्या विचारविश्वाचा सगळ्यात सुंदर अवशेष सध्या ऐकायला मिळत नाही. पण अजून वाचनात येतो : इकडून म्हणायचे झाले."

लेखिका : डॉ.मॅक्सीन बर्नसन, भाषातज्ञ
डॉ. मॅक्सीन बर्नसन या प्रगत शिक्षण संस्थेच्या व मराठी अभ्यास परिषदेच्या संस्थापक आहेत.त्यांनी बालकांना सुरवातीचे लेखन वाचन शिकवण्यासाठी प्रगत वाचन पद्धती विकसित केली. अमेरिकेतील इंग्रजी बोलणाऱ्या मुलांना मराठी शिकवण्यासाठी काही साहित्य तयार केले. मराठीतून मुबलक लेखन केले. अनेक वर्तमान पत्रे, नियतकालिके, मासिके यामधून शिक्षण विषयक विपुल लेखन, प्रोफेसर इमेरिटा,टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, हैद्राबाद या पदावर काम. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी भाषा शास्त्रीय संशोधनासाठी महाराष्ट्र शासनाचा डॉ. अशोक केळकर पुरस्काराने त्यांचा गौरव. आपण वाचू या प्रगत वाचन पद्धतीवरील पुस्तकाची तेलगू भाषेतील आवृतीची निर्मिती, एक ख्यातनाम शिक्षणतज्ञ म्हणून सुपरिचित.
No comments