राजुरी येथे पोलीस पाटलाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ फेब्रुवारी - : अल्पवयीन मुलीला रस्त्यात आडवून तिच्याशी अश्लिल भाषेत बोलून, तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तीच्या कुटूंबातील लोकांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी राजुरी ता. फलटण येथील पोलिस पाटलावर पोक्सो अंतर्गत तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. लक्ष्मण सुहास बागाव वय ३१ असे संमंधिताचे नाव असुन त्यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी की, राजुरी ता. फलटण येथील एका सोळा वर्षांच्या मुलीस ता. ३० जानेवारी रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास गावातील गायकवाड यांच्या शेताजवळ ती शाळेत जात असताना, लक्ष्मण बागाव याने तीचा पाठलाग करत येत तीला थांबवले. यानंतर येत्या सात तारखेला माझा वाढदिवस आहे, तेव्हा तु माझ्याबरोबर लॉजला चल असे म्हणत अश्लिल इच्छा व्यक्त केली. नंतर त्याच दिवशी मध्यरात्री बारा वाजता तीला घराबाहेर बोलावून तीच्याशी अश्लिल वर्तन केले. सदर प्रकाराची कुठे वाच्छता केली तर तुझ्या घरातील लोकांना संपवून टाकेन अशी धमकी दिल्याची फिर्याद संबाधित अल्पवयीन मुलीने नोंदविली आहे. यावरुन लक्ष्मण बागाव याच्याविरुध्द बालकाचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम व भा.द.वि.सं. अंतर्गत विनयभंग कलमांन्वये गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी बागाव यास अटक केली असुन पुढिल तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे करीत आहेत.
No comments