फलटण शहर व तालुक्यात उद्या २९ हजार बालकांना देणार पल्स पोलिओ डोस
ऊस तोडणी वाहतूक कामगारांच्या मुलांना डोस देताना आरोग्य कर्मचारी. |
फलटण दि. २६ : फलटण शहर व तालुक्यातील ० ते ५ वयोगटातील सुमारे २९ हजार बालकांना उद्या रविवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५ या वेळेत २३९ बूथ द्वारे पल्स पोलिओ डोस देण्यात येणार असून त्याचे संपूर्ण नियोजन पूर्ण झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे यांनी दिली आहे.
दरम्यान तालुक्यातील ४ साखर कारखान्यांच्या माध्यमातून सध्या ऊस गळीत हंगाम जोरात सुरु असून तेथे कार्यरत पर जिल्ह्यातील ऊस तोडणी वाहतूक मजुरांच्या खोपटावर जाऊन तेथील पात्र लाभार्थी मुलांना आरोग्य खात्याचे अधिकारी कर्मचारी यांनी आजच पल्स पोलिओ डोस दिल्याचे डॉ. पोटे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
० ते ५ वयोगटातील २९ हजार १४ पात्र लाभार्थी मुलांपैकी फलटण शहरात ५८२१, बरड प्रा. आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत ४५२५, बिबी प्रा. आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत २८२१, गिरवी प्रा. आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत ४११७, राजाळे प्रा. आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत ५१५०,
साखरवाडी प्रा. आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत २८०० आणि तरडगाव प्रा. आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत ३७८० पात्र लाभार्थी बालके असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पोटे यांनी सांगितले.
या सर्व २९ हजार १४ बालकांना पल्स पोलिओ डोस देण्यासाठी उद्या रविवार दि. २७ रोजी ३ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले १४५ आणि २ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले ९४ अशा एकूण २३९ बुथची व्यवस्था संपूर्ण तालुक्यात करण्यात आली असून तेथे ६२३ आणि या सर्व बुथचे काम सुरळीत व व्यवस्थित करुन घेण्यासाठी ४९ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे डॉ. पोटे यांनी सांगितले.
उद्या रविवारी या सर्व बुथद्वारे लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फेर सर्वेक्षण करुन तालुक्यातील सर्व ७४ हजार ६७० घरांना भेटी देवून तेथे कोणी पात्र लाभार्थी डोस घेण्याचे राहिले असेल तर त्यांना तेथेच लगेच पल्स पोलिओ डोस देण्यासाठी शहर व तालुक्यात २१४
खास पथकांमधील कर्मचारी प्रयत्नशील राहणार आहेत, त्यामुळे शहर व तालुक्यात कोणीही पात्र लाभार्थी डोस घेण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत असल्याचे डॉ. पोटे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
No comments