२ पिस्टल व काडतुसासह दोघांना फलटणमध्ये अटक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी शस्त्रांसह स्विफ्ट गाडीने फलटण कडे येत असल्याची खबर फलटण शहर पोलीस स्टेशन मिळताच, पोलिसांनी नाकेबंदी करून, आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे २ पिस्टल, १ जिवंत काडतुस, ७ मोबाईल, ११ मोबाईल बॅटऱ्या सापडल्या. पोलिसांनी स्विफ्ट गाडीसह शस्त्र,रोख रक्कम व इतर साहित्य असे मिळून एकुण ७ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील खुनाच्या गुन्हयात फरार असणारे आरोपी शस्त्रासह स्वीफ्ट गाडीने फलटणकडे येत असल्याची खबर मिळताच, फलटण शहर पोलीस स्टेशन यांनी दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास फलटण शहरातील जिंती नाका, बारामती पुल, नाना पाटील चौक या ठिकाणी तात्काळ नाकाबंदी केली. दरम्यान बारामती पूल येथील चेक पॉईंट वर संशयीत स्विफ्ट गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु सदरची गाडी तेथे न थांबता पुढे गेल्याने, फलटण शहर पोलिसांनी पाठलाग करत रानाडे पेट्रोल पंपाच्या समोर गाडीला आडवून, गाडीतील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी २:०४ वाजता रानडे पेट्रोलपंपासमोर फलटण येथे इसम नामे १) किरण बबन साळुंखे वय- ३८ वर्षे रा. गोकुळनगर कात्रज पुणे सध्या रा. फ्लॅट नं.५०१ लेक पँलेस अपार्टमेंट शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा २) तरबेज मेहबुब सुतार वय-३८ वर्षे रा.ओम साई अपार्टमेंट, फ्लॅट नं.३ वरखडेनगर, कात्रज पुणे यांनी आपले कब्जात स्वीफ्ट गाडी, दोन पिस्टल (अग्निशस्त्र),एक राऊंड (जिवंत काडतुस), ७ मोबाईल, ११ मोबाईल बॅटऱ्या, तसेच रोख रक्कम व इतर साहित्य असे मिळून एकुण ७,८४,६००/- रुपये किमतीचे साहित्य बाळगले स्थितीत मिळुन आले. त्यांचेविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम कलम ३, २५ व भादविस कलम ३४, महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.
No comments