दिगंबर आगवणे व इतर दोघांवर एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - : एका वर्षाच्या आत दुप्पट, तिप्पट, चौपट पैसे करुन देतो असे अमिष दाखवीत आयुर अर्बन मल्टिपर्पज निधी प्रा. लि. फलटण येथे गुंतवणूक करण्यास सांगुन २६ लाख ४१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दिगंबर आगवणे यांच्यासह अन्य दोघांवर फसवणूकीसह महाराष्ट्र प्रोटेक्शन इंटरेस्ट ऑफ डिपॉजीटर्स ॲक्टनुसार शहर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालाली माहिती अशी की, मोहन लक्ष्मण खरात वय ४० रा. विडणी ता. फलटण यांना दिगंबर आगवणे यांनी एका वर्षाच्या आत पैसे दुप्पट, तिप्पट,चौपट करुन देतो असे सांगितले. त्यानुसार १२ आक्टोंबर २०२० ते ११ डिसेंबर २०२० या कालावधीत मोहन खरात व त्यांच्या पत्नीने दागीणे गहाण ठेवून व घर विकून आलेल्या पैशांची ठेवीच्या पावत्या मोडून एकूण ३० लाख १ हजार रुपयांची गुंतवणूक आयुर मल्टी पर्पज निधी लि. फलटणमध्ये केली. सदर गुंतवणूकीपोटी परतावा म्हणून ३ लाख ६० हजार रुपये खरात यांना मिळाले आहेत. तसेच उर्वरीत रकमेवर बारा टक्के परतावा मिळणे अपेक्षित असताना आपणास अद्याप मुद्दल व व्याज मिळालेले नाही म्हणून जिल्हा न्यायाधीश सातारा यांच्याकडे खरात यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावरुन न्यायालयाने तपास करुन अहवाल सादर करनेबाबत आदेश दिले. त्यानुसार व मोहन खरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिगंबर रोहिदास आगवणे, सौ. जयश्री दिगंबर आगवणे व संतोष तुकाराम आगवणे सर्व रा. गिरवी ता. फलटण यांच्या विरुध्द फसवणूक केल्याचा, महाराष्ट्र प्रोटेक्शन इंटरेस्ट ऑफ डिपॉजीटर्स ॲक्टसह अन्य कलमांन्वये फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
No comments