जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करा : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हा चांगला मार्ग असल्याने सातारा जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने प्रतिवर्षी किमान १४ झाडे लावून त्यांचे संवर्धन केले तर निश्चित त्याचे चांगले परिणाम पहायला मिळतील असा विश्वास महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
लायन्स क्लब ऑफ फलटण प्लॅटिनमच्या माध्यमातून फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या श्रीमंत मालोजीराजे बालोद्यान या कायम स्वरुपी प्रकल्पाचे उद्घाटन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले, यावेळी आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४ डी १ चे द्वितीय उपप्रांतपाल एम जे एफ लायन भोजराज नाईक निंबाळकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सौ. नीलम लोंढे पाटील होत्या.
प्रामुख्याने शालेय विद्यार्थी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आमदार, सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी स्वतःहुन ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर, शेत रस्त्यावर तसेच शासकीय यंत्रणांनी आपल्या कार्यालय परिसरात वृक्षारोपण करुन त्याचे योग्यप्रकारे संवर्धन सामाजिक बांधीलकी म्हणून करावे अशी अपेक्षा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केली.
वृक्षारोपण व संवर्धनसाठी बिहार पॅटर्नची चर्चा सुरु आहे या योजनेंतर्गत एका कुटुंबाला काही झाडे लावून त्याचे संवर्धनासाठी सोपविण्यात येतात त्यासाठी रोजगार हमी योजनेतून मजुरी स्वरुपात काही रक्कम त्या कुटुंबाला दिली जाते त्यातून खात्रीने वृक्ष संवर्धन आणि त्या कुटुंबाला रोजगाराची संधी प्राप्त होत असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी निदर्शनास आणून दिले.
लायन्स क्लब आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त सहभागाने आयोजित करण्यात आलेल्या आभासी (Online) परिसंवादात राज्याचे पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांनी उपस्थित राहुन या कामातील राज्य शासनाच्या सक्रिय सहभागाची ग्वाही दिली त्याचप्रमाणे सुमारे ५० हजार नागरिकांनी या आभासी (On line) परिसंवादात सहभागी होऊन जागतिक तापमान वाढीची तीव्रता अधोरेखीत केल्याचे निदर्शनास आणून देत आता सातारा जिल्ह्याने यामध्ये पुढाकार घेऊन काम सुरु करावे असे आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
लायन्स क्लब ऑफ फलटण प्लॅटिनमच्या माध्यमातून सुरु असलेल्या लोकोपयोगी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करीत फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालये व कृषी विषयक प्रशालांच्या आवारातील बालवाडी व प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बालोद्यान उभारुन त्याच्या लोकार्पणानंतर या छोट्या मुलांसाठी ते उपलब्ध होईल त्यावेळी ती निश्चित समाधानी, आनंदी असतील असा विश्वास श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
फलटण लायन्स क्लबने गेल्या सुमारे ५० वर्षांपासून अंधत्व निवारणाच्या कामात केलेले काम प्रेरणादायी असून तीच भूमिका घेऊन फलटण लायन्स क्लब व येथील अन्य लायन्स क्लब यांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन क्षेत्रात काम करावे अशी अपेक्षा यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
लायन्स द्वितीय उप प्रांतपाल MJF लायन भोजराज नाईक निंबाळकर यांनी फलटण लायन्स क्लब सेवा क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असल्याचे निदर्शनास आणून देत नवीन स्थापन झालेल्या लायन्स क्लब ऑफ फलटण प्लॅटिनमने सेवा कार्यात गरुड भरारी घेऊन अनेक लोकोपयोगी उपक्रम सुरु केल्याचे निदर्शनास आणून देत या क्लबच्या अध्यक्षा सौ. नीलम लोंढे पाटील यांनी MJF स्वीकारली आहे तर श्रीमंत रामराजे व श्रीमंत संजीवराजे यांनीही फेलोशिप स्वीकारली आहे. जगभरातून जमा होणाऱ्या या फेलोशीपच्या रकमेतून लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून सेवा कार्यासाठी निधी उपलब्ध होत असून फलटण क्लबने यापूर्वी सर्वाधिक निधी मिळविला असून त्यातून लायन्स मुधोजी नेत्र रुग्णालयाची उभारणी केली आहे, आगामी काळात भरीव निधी प्राप्त करुन घेऊन नेत्र रुग्णालय अद्ययावत करण्याची योजना असल्याचे भोजराज नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
लायन्स क्लब ऑफ फलटण प्लॅटिनमच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी उपक्रम राबविताना राज घराण्यातील मान्यवर आणि लायन्स क्लब मधील दिग्गजांचे मार्गदर्शन व सहकारी लायन मेंबरचे सहकार्य व प्रोत्साहन सतत मिळत राहिल्याने आपण नेहमीच आघाडीवर राहुन काम केले, साहजिकच सर्वांच्या सहकार्याने मल्टिपल व डिस्ट्रिक्टमध्ये या क्लबच्या कामाची प्रशंसा होत असल्याचे सांगताना ते आपल्या एकट्याचे नव्हे सर्वांचे श्रेय असल्याचे अध्यक्षीय भाषणात सौ. नीलम लोंढे पाटील यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास बिल्डर्स असोसिएशनचे रणधीर भोईटे, प्रमोद निंबाळकर, लायन्स आय हॉस्पिटलचे अर्जुन घाडगे, सुहास निकम, माळजाई उद्यान समिती अध्यक्ष प्रतापसिंह निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य सर्वश्री हेमंत रानडे, नितीन गांधी, शरदराव रणवरे, रणजित निंबाळकर, राजेश नाईक निंबाळकर, प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महविद्यालय व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निंबाळकर, श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य कोळेकर, विजयकुमार लोंढे पाटील, अनिल शिंदे, किशोर देशपांडे यांच्या सह फलटणकर उपस्थित होते.
प्रारंभी लायन सौ. वैशाली चोरमले यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात लायन्स क्लब ऑफ फलटण प्लॅटिनमने केलेल्या सेवा कार्याचा आढावा सादर केला. लायन सौ. राजश्री शिंदे यांनी सूत्र संचालन केले.
No comments