फलटणची खो-खो, हॉकी परंपरा अखंडित सुरु ठेवण्यासाठी क्रीडा शिक्षक व खेळाडूंनी चांगला सराव व खेळामध्ये सातत्य ठेवावे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
![]() |
उन्हाळी प्रशिक्षण शिबीर उद्घाटन प्रसंगी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : फलटणला खोखो, हॉकी या खेळाची फार मोठी परंपरा आहे. जगन्नाथ धुमाळ सर यांनी हॉकीमध्ये राज्य व राष्ट्रीय खेळाडू तयार केले, त्यांनी खर्या अर्थाने हॉकीची परंपरा चालू ठेवली, ती वाढत पुढे गेली, अलीकडे ही परंपरा थोडी मागे पडत असल्याचे निदर्शनास आणून देत ती अखंडित सुरु ठेवण्यासाठी सर्व क्रीडा शिक्षक व खेळाडूंनी चांगला सराव व खेळामध्ये सातत्य ठेवले तर पूर्वीप्रमाणे राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार होतील असा विश्वास महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
![]() |
उन्हाळी प्रशिक्षण शिबीर - खेळाडूंसमवेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व किडा समिती सदस्य. |
फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समितीच्यावतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दि. १५ एप्रिल ते दि. ३० मे दरम्यान घडसोली मैदान, फलटण येथे करण्यात आले आहे. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित विविध शाळा, माध्यमिक विद्यालये, महविद्यालयातील सुमारे ६०० विद्यार्थी/विद्यार्थिनी या शिबीरात सहभागी झाले आहेत. शिबीराचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी व महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे, मुधोजी हायस्कूलचे उपप्राचार्य ए. वाय . ननवरे, क्रीडा समिती सदस्य महादेव माने, संजय फडतरे, शिरीष वेलणकर यांच्यासह क्रीडा शिक्षक, विद्यार्थी/विद्यार्थिनी उपस्थित होते.
![]() |
श्रीफळ वाढवून उन्हाळी प्रशिक्षण शिबीर उद्घाटन करताना शिवाजीराव घोरपडे शेजारी श्रीमंत संजीवराजे व अन्य मान्यवर |
आगामी काळामध्ये खो - खो, कबड्डी, हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, हॉकी, फुटबॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्याचे सूतोवाच करतानाच फलटण तालुक्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करुन उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीरात सहभागी खेळाडूंना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यानी शुभेच्छा दिल्या.
विनय नेरकर या हॉकी खेळाडूचा शिवाजी विद्यापीठ हॉकी संघाचा कर्णधार म्हणून निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या शिबीरामध्ये हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो - खो, कबड्डी, कुस्ती व आर्चरी या खेळांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. घडसोली मैदान येथे हॉकी, फुटबॉल, खो - खो, हॉलीबॉल या खेळांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, मुधोजी महाविद्यालय, फलटणच्या क्रीडांगणावर ॲथलेटिक्स, कुस्ती व कबड्डी, मुधोजी क्लब येथे बास्केटबॉल या खेळाचे तसेच श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल जाधववाडी येथे आर्चरी या खेळासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
हॉकी साठी महेश काळे, सचिन धुमाळ, कु. धनश्री क्षीरसागर, फुटबॉल साठी अमित काळे, मोनील शिंदे, बास्केटबॉल साठी बाबर, रोहन निकम, संकेत कुंभार, हॉलीबॉल साठी डॉ. स्वप्नील पाटील, बी. जी. शिंदे, डी. एन. शिंदे, सौरभ चतुरे, अथलेटिक्स साठी राज जाधव, प्रा. तायप्पा शेंडगे, कबड्डी साठी तुषार मोहिते, ए.बी. सुळ, खो - खो साठी अविनाश गंगतीरे, सावंत, पवार, मुलाणी मॅडम, कुस्ती साठी कु. अनिता गव्हाणे, आर्चरी साठी सुरज ढेंबरे हे शिबीरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
सदर शिबीरामध्ये खेळाडूंची शारीरिक क्षमता, खेळाडूंचा आहार संबंधीत खेळाचे कौशल्य याविषयी तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
उन्हाळी प्रशिक्षण शिबीर उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन क्रीडा समिती सदस्य तुषार मोहिते सर यांनी केले तर प्रास्तविक क्रीडा समिती सचिव सचिन धुमाळ सर यांनी, आभार क्रीडा समिती सदस्य प्रा. तायाप्पा शेंडगे सर यांनी केले.
No comments