शिवरुपराजे खर्डेकर यांच्या प्रयत्नाने फलटण - आसू मार्गावर एसटी पूर्ववत सुरु
![]() |
एस. टी. चालक, वाहक यांचा सत्कार करताना महादेव सकुंडे, प्रमोद झांबरे, राहुल पवार आणि इतर. |
आसू (गंधवार्ता वृत्तसेवा) : आसू - फलटण मार्गावर एस. टी. बस सेवा पूर्ववत सुरु झाली आहे. या बसच्या दररोज तीन फेऱ्या नियमीत सुरु राहणार असून प्रवाशी संख्येनुसार फेऱ्या वाढविण्याचे एस. टी. प्रशासनाने मान्य केले आहे. एस. टी. बस सुरु झाल्याने आसूसह मार्गावरील सर्व गावांतील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर यांच्या प्रयत्नातून तब्बल तीन वर्षांनी आसू - फलटण मार्गावर एस. टी. बस सेवा सुरु झाली आहे.
कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन अडीच वर्षे आसू - फलटण मार्गावरील एस. टी. बस सेवा ठप्प झाली, त्यानंतर एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांचे गेली पाच महिने सुरु असलेल्या आंदोलना मुळे जवळपास तीन वर्षे एस. टी. बस सेवा बंद राहिल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, मजूर, शेतकरी, सामान्य नागरीक यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. सद्यस्थितीत कोरोना नियंत्रणात असल्याने शासनाने अनेक निर्बंध शिथील केल्याने टप्या टप्प्याने व्यवहार सुरळीत सुरु होत आहेत.
एस. टी. बस आसू येथे पोहचल्या नंतर चालक व वाहक यांचा सत्कार सरपंच महादेव सकुंडे व जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष प्रमोद झांबरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आसू नं.१ सोसायटीचे अध्यक्ष राहुल पवार (ढवळे), दादासो घोरपडे, इब्राहिम इनामदार, पै. हणमंत फडतरे, सुनील सस्ते, आनंद पवार, जहिरुद्दीन शेख यांच्यासह प्रवाशी उपस्थित होते.
गेली तीन चार महिने शाळा सुरु आहेत. अशा स्थितीत आता एस. टी. बस सुरु होणे गरजेचे आहे अशी नागरिकांची मागणी होती. याबाबत श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर यांनी फलटण एस. टी. आगाराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एक एस. टी. बस सुरु करण्याचे मान्य केले आणि आज एस. टी. बस आसू येथे आली. त्यामुळे आसू सह फलटण - आसू मार्गावरील नागरिकांनी समाधान व्यक्त करुन श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर आणि फलटण एस. टी. आगाराच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.
No comments