पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती फलटण येथे उत्साहात साजरी
![]() |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करताना प्रा. राम शिंदे, खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, महादेवराव पोकळे, बजरंग गावडे, सुशांत निंबाळकर, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे वगैरे |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती फलटण तालुका अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून फलटण मध्ये मोठ्या उत्साहात दांडपट्टा व हलगी, तुतारी वगैरे पारंपारिक वाद्याच्या गजरात, मनोवेधक फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
फलटण तालुका अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आयोजित जयंती उत्सवाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथील त्यांचे वंशज व माजी मंत्री प्रा. राम शिंदे होते. माढा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, रासप प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, सुशांत निंबाळकर, नगर परिषदेतील विरोधी पक्ष माजी गट नेते अशोकराव जाधव, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, भाजपा तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, उत्सव समितीचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य महादेवराव पोकळे, प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. जे. टी. पोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. राम शिंदे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांचा सामाजिक, राजकीय व धार्मिक इतिहास जाज्वल्य असून त्यांनी जे असामान्य कर्तृत्व केले त्यामुळेच आज आपण २९७ वर्षे झाली तरी त्यांची जयंती साजरी करीत असून त्यांनी केलेल्या कार्याची आजही आपल्याला आठवण येते. २९७ वर्षापूर्वी एका महिलेने २८ वर्षे राज्य करुन एक मोठी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्रांती केली. मावळ प्रांत जिंकून घेतला. अटकेपार झेंडा लावण्याचे कार्य करणाऱ्या मल्हारराव होळकर यांचा जन्म फलटण तालुक्यातील होळ येथे असल्याने आपण फलटणकर क्रांतिकारक लोक असल्याचे सांगत अहिल्यादेवींचे कार्य आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक असल्याचे प्रा. राम शिंदे यांनी स्पष्ट केले.
धनगर आणि धनगड या शब्दातीला भेद पहिल्यांदा बाजूला करा व धनगर समाजाला एससी, एसटी आरक्षणाची सुविधा उपलब्ध करुन द्या अशी मागणी आपण सर्वप्रथम संसद भवनात केली असल्याचे सांगून धनगर समाजाला त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय आपण थांबणार नाही असे स्पष्ट आश्वासन देताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्यातील ज्या राज्यकर्त्यांच्या चुकीमुळे ओबीसींचे आरक्षण गेले ते लोक निवडणूकीत आता जनतेसमोर कोणत्या तोंडाने जातील असा प्रश्न विचारत निवडणूका तोंडावर आल्या की समाजात आणि आता तर जयंती उत्सवाच्या माध्यमातून आत्ताच वेगवेगळे गट तयार करुन भांडण लावण्याचे काम सध्याचे राज्यातील राज्यकर्ते करीत असल्याचे सांगत यापुढे आपण अहिल्यादेवी होळकर यांच्याच विचाराने कार्य केले पाहिजे असे आवाहन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजप सातारा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, काशिनाथ शेवते, महादेवराव पोकळे, प्रा. रवींद्र कोकरे, डॉ. स्नेहा सोनटक्के, प्रा. नितीन नाळे, नानासाहेब इवरे, अशोकराव जाधव, वाखरीच्या सरपंच सौ. शुभांगी तुकाराम शिंदे, कु. नम्रता पोंद्कुले, संगीता कोकरे यांनी यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आपले विचार व्यक्त केले.
उत्सव समितीच्या वतीने अरविंद मेहता व प्रा. रमेश आढाव यांना राजे यशवंतराव होळकर पत्रकार भूषण पुरस्कार, डॉ. युवराज कोकरे यांना यशवंतराव होळकर आरोग्य भूषण, सौ. सुनिता वाघमोडे, ॶॅड. बाबासाहेब सरक, ॶॅड. नरसिंग शिंदे ॶॅड. अविनाश सुळ यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी सामाजिक पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. नवनियुक्त पोलिस उपनिरीक्षक वैभव धायगुडे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची फलटण शहरातून सवाद्य मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली यावेळी फलटण शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
No comments