उद्धव ठाकरेंचा राजीनामा
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे अल्पमतात आलेल्या उद्धव ठाकरे सरकारने ३० जून रोजी बहुमत सिद्ध करावे, असे आदेश राज्यपालांनी बुधवारी दिले. त्यावर आक्षेप घेत शिवसेनेने याचिका दाखल केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने रात्री ९.२० वाजता ती फेटाळून लावत राज्यपालांचे आदेश कायम ठेवले. यानंतर ३० मिनिटांतच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा व विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार आहे, शिवसैनिकांची सेवा करणार आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापासून बंडखोर आमदारांचा समाचार घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उशीरा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे.
No comments