Breaking News

राज्यातील प्रत्येक तालुक्यात रक्तपेढी सुरू करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

Blood banks will be started in every taluka of the state - Health Minister Rajesh Tope

    मुंबई : राज्यातील प्रत्येक तालुक्यात येत्या वर्षभरात रक्तपेढी सुरू करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

    महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने आज राज्यस्तरीय रक्तदाता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी एन., श्री साईबाबा शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे आदी उपस्थित होते.

    मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले की, रक्ताला अद्यापही विज्ञानाने पर्याय दिलेला नाही. त्यामुळे रक्तदान केले पाहिजे. कोविडच्या कालावधीतही आपल्या राज्याने देशातील सर्वात जास्त युनिट रक्त संकलन केले आहे. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. राज्याच्या अनेक तालुक्यांत रक्तपेढी नाहीत, अशा तालुक्यात रक्तपेढी सुरू करण्याचा राज्य शासन विचार करीत आहे. रक्तदानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जाईल.

    अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. शिंगणे यांनी कोविडच्या कालावधीतही महाराष्ट्रात सर्वाधिक रक्त संकलन केले आहे. याकाळात राज्यातील सर्व रक्तदाता यांनी अतिशय उर्त्स्फुतपणे रक्तदान केले. सर्वधर्मसमभाव ही संकल्पना रक्तदानातून साध्य होते. आई वडिलांच्या खालोखाल रक्तदानातून जोडले गेलेले नाते सर्वात पवित्र आहे. रक्तदानाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज आहेत, हे गैरसमज दूर करण्याची गरज आहे, असे सांगितले.

    डॉ. प्रदीप व्यास यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी राज्यातील रक्तपेढी नसलेल्या भागात रक्तपेढी सुरू करण्यास सामाजिक संघटनांनी पुढे यावे, असे आवाहन केले.

    यावेळी सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ अरुण थोरात, डॉ. अर्चना जोगेवार, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात रक्तदाते, रक्त संकलन करणाऱ्या रक्तपेढी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

No comments