Breaking News

फलटण येथे हमी भाव कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी ; सहकार व पणन मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

Demand to start guaranteed price cotton procurement center at Phaltan; Positive response from the Minister of Co-operation and Marketing

      फलटण (गंधवार्ता वृत्ततसेवा) : फलटण तालुक्यात कापसाचे क्षेत्र वाढत असताना त्याच्या हमी भावाने मार्केटिंग फेडरेशन मार्फत खरेदीची व्यवस्था करण्याच्या आ. दिपकराव चव्हाण यांच्या मागणीला दुजोरा देत राज्याचे सहकार पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना त्याबाबत दूरध्वनीद्वारे स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

        संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या आळंदी ते पंढरपूर या आषाढी वारी दरम्यान सातारा जिल्ह्यातील व्यवस्थेची पाहणी व अपूर्ण कामांची पूर्तता वेळेत करुन घेण्याच्या उद्देशाने आयोजित दौऱ्यात तरडगाव ता. फलटण येथे आ. दीपकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी तरडगाव व परिसरातील ग्रामस्थांच्या बैठकीत आ. चव्हाण यांनी हमी भावाने कापूस खरेदी करण्याची मागणी केली. त्यावेळी ना. पाटील यांनी सविस्तर चर्चा करुन त्यानंतर संबंधीत अधिकाऱ्यांना वरीलप्रमाणे सूचना केल्या आहेत.

     महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही याबाबत आपल्याला यापूर्वी सूचना केल्या असल्याचे संबंधीत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत प्रसंगी काही नियम निकष शिथील करुन फलटण येथे हमी भाव कापूस खरेदी केंद्र सुरु करुन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी योग्य असून त्यातून आगामी काळात या भागात कापसाचे क्षेत्र निश्चित वाढेल अशी अपेक्षा ना. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे.

    फलटण, बारामती, माळशिरस, पंढरपूर या तालुक्यात पूर्वी मोठ्या प्रमाणावर कापसाचे पीक घेतले जात असे, मात्र त्याकाळी मोठ्या प्रमाणावर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने टप्याटप्प्याने या भागातील कापूस क्षेत्र कमी कमी होत गेले, आता सुमारे १५/२० वर्षांनी पुन्हा कापसाचे क्षेत्र वाढत असताना शासन प्रशासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नियम निकषांपलीकडे जाऊन प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे आ. दिपकराव चव्हाण यांनी यावेळी पालक मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

       फलटण येथे एक सहकारी जिनींग प्रेसिंग संस्था प्रशस्त जागा, इमारती, गोडवून सह कापूस खरेदी व प्रक्रियेसाठी उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे आसू येथे एक सहकारी जिनिंग आणि फलटण येथे ३ खाजगी जिनिंग संस्था उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून देत यावर्षी तालुक्यात स सुमारे ४००/५०० हेक्टर क्षेत्रावर कापूस लागण झाली असून यावर्षी १५०० हेक्टर पर्यंत कापूस लागण अपेक्षीत आहे, हमी भाव खरेदी केंद्र सुरु झाले तर कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने खरेदी केंद्र सुरु करुन कापूस उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची मागणी आ. दीपकराव चव्हाण यांनी या बैठकीत लावून धरली होती. त्यानंतरच पालक मंत्र्यांनी संबंधीत यंत्रणेला वरीलप्रमाणे स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

    प्रारंभी आ. दीपकराव चव्हाण, सरपंच सौ. जयश्री चव्हाण, उप सरपंच प्रशांत गायकवाड यांनी तरडगाव ग्रामस्थांच्या वतीने पालक मंत्री ना. बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विनय गौडा, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, गट विकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार वगैरेंचे स्वागत केले.

No comments