Breaking News

माऊलींच्या पालखी सोहोळ्यासाठी फलटणकर सज्ज

Phaltankar ready for Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २९ : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळा दि. १ व २ जुलै रोजी फलटण येथील प्रशस्त पालखी तळ (विमान तळ) येथे विसावणार असून पालखी तळ आणि शहरातून जाणारा पालखी मार्ग, पालखी तळ आणि गावात उतरणाऱ्या दिंड्या यांच्यासाठी आरोग्य, वीज, पाणी, महिलांसाठी स्नानगृह व सर्वांसाठी शौचालये आदी सुविधा देण्याची जबाबदारी नगर परिषदेने स्वीकारली असून मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांचे मार्गर्शनाखाली संपूर्ण नगर परिषद यंत्रणा कार्यरत असून सर्व कामे पूर्णत्वाच्या अंतीम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.
शहरातील रस्त्यांची स्वच्छता, दुरुस्ती, डांबरीकरण
     पालखी सोहोळा शहरात प्रवेश करतो तेथील मुख्य रस्ता (फलटण - पंढरपूर रोड) ते पालखी तळापर्यंत शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गाची दुरुस्ती, डांबरीकरण करण्यात आले असून विशेषत: पालखी तळ प्रवेशाच्या ठिकाणी फलटण न्यायालया समोरील रस्त्याची झालेली दुरावस्था दूर करुन तो रस्ता पूर्णत: डांबरी करण्यात आला आहे, तसेच शहरातून जाणाऱ्या संपूर्ण पालखी मार्गावरील आणि पालखी तळावरील झाडे झुडपे काढणे, संपूर्ण मार्ग व पालखी तळाची स्वच्छता करण्यात आली असून सोहोळा २ दिवस वास्तव्यास असल्याने त्याकाळात आणि नंतर पालखी तळ व शहरातील स्वच्छता व कचरा उचलणेसाठी जादा १३० आरोग्य कर्मचारी आणि १६ घंटा गाड्या, ४ ट्रॅक्टर ट्रॉली, ३ मोठी वाहने (४०७ छोटा ट्रक) असे नियोजन करण्यात आले आहे.
तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था
        प्रशासनाने १ हजार फिरती शौचालये उपलब्ध होतील असे नियोजन केले असून निर्मल वारी संस्थेने केलेल्या नियोजनानुसार ती पालखी तळ व परीसरात लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पालखी तळावर तात्पुरती सुमारे १००० शौचालये उभारण्यात आली असून त्यापैकी ५०० महिलासाठी राखीव ठेवणेत आली आहेत.
   पालखी तळावर ३ मोठे हायमास्ट टॉवर उभारुन संपूर्ण पालखी तळावर उत्तम प्रकाश व्यवस्था करण्यात येत असून शौचालये व अन्य ठिकाणी अखंडित वीज पुरवठ्यासाठी १५ जनरेटर्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

फलटण पालखी तळाची स्वच्छता करताना नगर परिषद कर्मचारी समवेत मुख्यधिकारी संजय गायकवाड, नगर अभियंता पी. एन. साठे, स्वच्छता निरीक्षक विनोद जाधव व इतर

महिलांसाठी स्नानगृहे आणि पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे
    पालखी तळावर महिलांसाठी स्नानगृहे उभारण्यात येत असून त्याचे काम सुरु आहे. पालखी सोहोळा २ दिवस मुक्कामास असल्याने पिण्याच्या व वापराच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यासाठी शहरातील ३ ठिकाणी फिडिंग पॉइंटवर टँकर भरण्याची व्यवस्था करण्यात येत असून शासकीय व खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्याशिवाय जादा पाईप लाईन वापरुन पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तात्पुरत्या शौचालयांच्या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात येत आहे. 
   पालखी तळावर आणि अन्यत्र लावण्यात येत असलेल्या किराणा, भाजीपाला व अन्य दुकानांचा वारकरी, भाविक भक्तांना अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन त्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
मांस, मटण, मच्छी विक्रीवर निर्बंध
    पालखी सोहळ्याच्या येथील वास्तव्या दरम्यान शहरात दि. ३० जून रात्री १० ते दि. ३ जुलै सकाळी १० या कालावधीत फलटण शहरात मांस, मटण, मच्छी व तत्सम विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यास दंड व शिक्षेची तरतूद असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
मंडळे, स्वयंसेवी संस्था, गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांचा सहभाग
     शहरातील गणेशोत्सव मंडळे, तरुण मंडळे, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था आणि शहरातील नागरिक यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे माऊलींच्या स्वागताची आणि सोहोळ्यातील भाविक, वारकरी, दिंडीकरी यांच्या निवास व भोजन व्यवस्थेसाठी नियोजन करण्यात येत असून नेहमी प्रमाणे काही ठिकाणी गोडधोडाचे तर काही ठिकाणी पिठले भाकरी, वांगे भाकरी असा उत्तम बेत करण्यात येतो. 
       त्याचप्रमाणे सकाळचा चहा, न्याहरीची व्यवस्था काही ठिकाणी करण्यात येते, या सर्व व्यवस्थेसाठी सर्व मंडळे आणि शहरवासीय तयारी पूर्ण करुन माऊलींच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत.
स्वयंपाकाचा गॅस पुरेशा प्रमाणात उपलब्ध
     पालखी सोहळ्यातील वारकरी आणि भाविकांसाठी पुरेसा इंधन साठा विशेषत: स्वयंपाकाचा गॅस मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येत असून तालुक्यातील ३ ही मुक्कामाच्या ठिकाणी स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था महसूल विभागांतर्गत पुरवठा विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
पालखी तळावर स्वच्छतेची व्यवस्था
       पालखी तळावर (विमान तळ) फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छतेसह अन्य व्यवस्था करण्यात येत आहे. तळावर माऊलीचा तंबू आणि त्या शेजारच्या मानकरी यांच्या तंबुसाठी प्रतिवर्षाप्रमाणे योग्य नियोजन व आखणी करण्यात येत असून अखंडित वीज पुरवठा, स्वच्छ पाणी व्यवस्था करण्यात येत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन झाले पाहिजे यासाठी बॅरेगेटींग लावून रांगेत दर्शन व्यवस्था करण्यात येणार आहे.
पालखी तळावर चौकशी कक्ष
     फलटण पालखी तळावर आरोग्य विभागाच्यावतीने तात्पुरता दवाखाना, चौकशी कक्ष तसेच शहरामध्ये म. फुले चौक, पाचबत्ती चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, डी. एड. कॉलेज चौक याठिकाणी मदत कक्ष उभारण्यात येत असून तेथे वारकरी  व पोलिस चौकी तसेच छोटा मंडप उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे श्रीराम बझारच्या माध्यमातून आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी स्टॉल लावण्यात येणार आहे. फलटण लायन्स क्लब आणि डॉक्टर्स असोसिएशन यांच्या माध्यमातून तातडीच्या वैद्यकिय सेवेची सुविधा पालखी तळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
व्यवस्था नियंत्रण व मार्गदर्शन
     जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नियोजन करण्यात आले असून त्याशिवाय
प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांची  इन्सिडंट कमांडर, तहसीलदार समीर यादव यांची ॶॅडिशनल इन्सिडंट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी वेळोवेळी बैठका घेऊन दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार नगरपरिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  संपूर्ण व्यवस्था चोख ठेवण्याचे नियोजन केले आहे.
स्वच्छतेसाठी जादा अधिकारी, कर्मचारी
    जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील कराड नगरपालिकेचे ३० सफाई कर्मचारी व सातारा नगरपालिकेचे ३० सफाई कर्मचारी, वाई नगरपालिकेचे १० सफाई कर्मचारी, ३ स्वच्छता निरीक्षक, ६ मुकादम आणि पाण्याचे टँकर्स  पालखी सोहोळा पुढे गेल्यानंतर स्वच्छता करण्यासाठी विशेष आदेशाद्वारे उपलब्ध करुन दिले आहेत.
सुरक्षितते साठी विशेष दक्षता
     पालखी सोहोळा मुक्काम दरम्यान मोठ्या संख्येने भाविक, वारकरी, दिंडीकरी, विविध विक्रेते शहरात येत असतात परिसरातील भाविक दर्शनासाठी येतात या दरम्यान कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सार्वजनिक वास्तूंचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून आणि वीज वाहक तारा, खांब, ट्रान्सफॉर्मर सेंटर्स यांचे वीज वितरण कंपनी कडून स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्यात येणार आहे.

No comments