Breaking News

नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्यांची २१ जूनला प्रसिद्धी

Publication of draft voter lists for Municipal Councils and Nagar Panchayats on 21st June

मुंबई, दि. 10 : विविध जिल्ह्यांमधील 221 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 जून 2022 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 27 जून 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले.

मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेल्या 221 नगरपरिषदा/ पंचायतींमध्ये 208 नगरपरिषदा आणि 13 नगरपंचायतींचा समावेश आहे. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 21 जून 2022 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 21 ते 27 जून 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 1 जुलै 2022 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 5 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.

No comments