Breaking News

राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी श्रीमंत रामराजे व एकनाथ खडसे ; दोन्ही उमेदवार विजयी होतील - जयंत पाटील

Shrimant Ramraje Nike Nimbalkar and Eknath Khadse from NCP for Legislative Council; Both the candidates will win - Jayant Patil

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ जून - विधान परिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीला वेग आला आहे.  येत्या २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचीही नावे निश्चित झाली असून, आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच एकनाथ खडसे हे आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या विधानपरिषद निवडणुकीसाठी श्री. रामराजे नाईक निंबाळकर आणि श्री. एकनाथराव खडसे हे उमेदवार असतील असे जाहीर करून, दोन्ही उमेदवार विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा विश्वास  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून व्यक्त केला आहे. 

    भारतीय जनता पार्टीकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड शिवसेने कडून सचिन अहिर, आमशा पाडवी काँग्रेस कडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर १० सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यात भाजप ४, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी २ असे एकूण १० आमदार निवडले जाऊ शकतात.

     विधान परिषदेवर जाणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 27 मते आवश्यक आहेत. हे मतदान गुप्त पद्धतीने केले जाते. सध्याच्या राजकीय संख्याबळानुसार, भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. पण भाजपने पाचवाही उमेदवार दिला आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 उमेदवार निवडून येऊ शकतात. काँग्रेसने दोन उमेदवार दिले आहेत. पण त्यांना दुसरा उमेदवार निवडून येम्यासाठी आणखी १० मतांची गरज आहे. त्यामुळे काँग्रेसचा दुसरा आणि भाजपचा पाचवा उमेदवार यापैकी एक निवडून येणार असल्याने या दोघांमध्ये टक्कर पहायला मिळणार आहे.

No comments