Breaking News

७ वर्षापासून फरार असणार्‍या दरोडेखोरास तलवारीसह फलटण ग्रामीण पोलीसांकडुन जेरबंद !

The absconding robber was arrested by the Phaltan rural police with a sword

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २७ - फलटण ग्रामीण, लोणंद व सातारा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असणाऱ्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड असणाऱ्या अट्टल दरोडेखोरास फलटण ग्रामीण पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. सदर  आरोपी हा मागील सात वर्षापासून फरार होता. त्याच्या विरोधात विविध पोलीस स्टेशनमध्ये दरोडा, अपहरण, चोरी व दुखापत यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच फलटण ग्रामीण पोलिसांनी दि.२५ जुलै रोजी, पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या कब्जात एक तलवार मिळुन आली आहे, याबाबत शस्त्र अधिनियम अंतर्गत त्याच्यावर आणखी एक गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहर पोलीस ठाणे गु. र. नं. ४७५/२०१९. भा. दं. सं. कलम ३९५, ३९७, ४५७, ३८० या गुन्ह्यातील फिर्यादी ह्या सोनगाव (क्षेत्रमाहुली), ता. जि. सातारा या गावातील रहिवाशी असून दि. ११/०७/२०१९ रोजी रात्री ०१.३० वा. चे सुमारास त्या त्यांच्या घरात असताना एकुण ७ अनोळखी आरोपींनी त्यांच्या घरात घुसून लोखंडी कोयता व लाकडी दांडक्याने फिर्यादी व त्यांचा मुलगा यांना मारहाण करुन सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरुन नेल्याबाबतच्या तक्रारीवरुन वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

    प्रस्तुत गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपी गरिब्या उर्फ बाळु शिवा काळे वय २५ वर्ष, रा. वडगाव, ता. फलटण याचा व त्याचे इतर ६ साथीदारांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर इतर ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु आरोपी गरिब्या उर्फ बाळु शिवा काळे हा सन २०१९ पासून फरार होऊन पोलीसांना गुंगारा देत होता. याशिवाय त्याचेविरुद्ध १) फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. ७६/२०१५. भा. दं. सं. कलम ३२४, ३२३ २) लोणंद पोलीस ठाणे, गु. र. नं. ३९/२०१९, भा. दं. सं. कलम ३६६ (अ) १४३, १४७, १४८. १४९, ३४१, ३५४, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२. शस्त्र अधिनियम कलम ४, २५ हे गुन्हे नोंद असून तो सदर दोन्ही गुन्ह्यांमध्ये अद्याप पर्यंत फरार होता.

     पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे,   यांनी सराईत व अट्टल दरोडेखोर गरिब्या उर्फ बाळु शिवा काळे वय २५ वर्ष, रा. वडगाव, ता. फलटण यास लक्ष करुन पकडण्याच्या सूचना फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे  यांना दिल्या होत्या. त्यानुसार पो. नि. धन्यकुमार गोडसे यांच्या अधिपत्याखाली तपास पथकास दि. २५/०७/२०२२ रोजी आरोपी गरिब्या उर्फ बाळु शिवा काळे वय २५ वर्ष, रा. वडगाव, ता. फलटण हा वाघोशी, ता. फलटण या ठिकाणी असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरुन तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन गोपनीय बातमीदारामार्फत त्याच्या ठावठिकाण्याची अचुक माहिती काढुन सापळा लावुन त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो त्यावेळी बाजूच्या डोंगरातून पळु लागला. परंतु तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या कब्जात एक तलवार मिळुन आली आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. ५१७ /२०२२. शस्त्र अधिनियम कलम ४,२५ हा गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याचा पुढील तपास पो. हवा. प्रकाश खाडे हे करीत आहेत.

    पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या सूचनेप्रमाणे  फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस अंमलदार अभिजित काशिद, अमोल जगदाळे, वैभव सूर्यवंशी, राजकुमार देवकर, महेश जगदाळे, गणेश अवघडे व निखिल गायकवाड यांनी सदरची कारवाई केलेली आहे.

No comments