Gandhawarta SPECIAL - Aggressive Panther Chandrakant Ahiwale passed away - Vijay Yevale
भारतीय दलित पॅंथर पासून कार्यरत असणारे लढाऊ चंद्रकांत अहिवळे यांचे अल्पशा आजाराने सातारा येथे दुःखद निधन झाले, त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीला फार मोठा आघात झालेला असून, समाजात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.
दि. ४ नोव्हेंबर १९८५ रोजी फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी व पॅंथर नेते रामदासजी आठवले, गंगाधर आंबेडकर, रोहिदास गायकवाड, शिल्पा उमरीसकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथील ऐतिहासिक लाटकर व्यासपीठ येथे भारतीय दलित पॅंथर ची स्थापना झाली. दलित पॅंथरचे तालुकाध्यक्ष म्हणून सूर्यकांत अहिवळे आणि शहराध्यक्ष म्हणून चंद्रकांत अहिवळे यांची निवड करण्यात आली. पुढे मधुकर काकडे, विजय येवले, मुन्ना शेख, बाबा लोंढे, मुसा इनामदार, शंकर पवार असे अनेक कार्यकर्ते बरोबर घेऊन, चंद्रकांत अहिवळे यांनी फलटण शहरांमध्ये वादळ निर्माण केले.
फलटण शहर व तालुक्यातील दलित, वंचित, उपेक्षित घटकांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचार याचा सामना करण्यासाठी तसेच समाजातील अंधश्रद्धा यांचा बिमोड करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून चंद्रकांत अहिवळे सारखा तरुण कार्यकर्ता पुढे आला आणि पॅंथरच्या माध्यमातून समाजाला व तरुण पिढीला एक नवीन दिशा दिली. आज चंद्रकांत अहिवळे अनंतात विलीन झाले असले तरी त्यांनी केलेले कार्य आम्ही कधीच विसरू शकणार नाही, चंद्रकांत अहिवळे यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये पॅंथरचा झंझावात निर्माण केला. त्यांच्या याच गुणामुळे सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून चंद्रकांत अहिवळे सर्वत्र परिचित होते. चंद्रकांत यांच्यात जाण्यामुळे एक चंद्रकांत अहिवळे नावाचे वादळ आज शांत झाले आहे, त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली!
- विजय येवले
जिल्हा सचिव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
No comments