Breaking News

कोळकीच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

All round development of Kolaki always a priority - Shrimant Sanjeevraje Naik Nimbalkar

   फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण शहरालगत असल्याने कोळकी ग्रामपंचायत क्षेत्रात लोकवस्ती झपाट्याने वाढत असून नागरी सुविधा विशेषत: पाणी पुरवठा योजना कमी पडत असल्या तरी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोळकीच्या विकासासाठी, येथील विविध विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात दिली आहे.

     सातारा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत जल जीवन मिशन माध्यमातून सुमारे २ कोटी रुपये खर्चाच्या नळ पाणी पुरवठा योजना भूमीपूजन  वनदेवशेरी व महादेव मळा (कोळकी) येथे समारंभपूर्वक संपन्न झाले. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे  बोलत होते. यावेळी आ. दीपकराव चव्हाण, कोळकी ग्रामपंचायत सरपंच सौ. विजया नाळे, ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, उपसरपंच संजय कामठे, माजी सरपंच कुंडलिक नाळे, ग्रामविस्तार अधिकारी प्रभाकर लंगुटे, संजय गांधी निराधार योजना सदस्य प्राचार्य अर्जुन रुपनवर यांच्यासह कोळकी ग्रामपंचायत आजी, माजी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

    लोकसंख्या वाढीचा वेग विचारात घेऊन संपूर्ण कोळकीसाठी एकच पाणी पुरवठा योजना कशी उभारता येईल यासाठी सर्वेक्षण करुन आगामी २५/३० वर्षे उपयुक्त ठरेल अशी मोठ्या क्षमतेची योजना मंजूर करुन घेऊन त्याची उभारणी करण्याचा मनोदय व्यक्त करताना त्यासाठी महाराष्ट्र विधान परिषद  सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र व स्वयंपूर्ण पाणी पुरवठा योजना भरघोस निधी सह मंजूर करुन घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे स्पष्ट संकेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहेत.

    श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळे कोळकीतील कोणत्याही विकास योजनेला निधी कमी पडला नाही यापुढेही पडणार नाही असे सांगत मालोजीनगर कोळकी भाग वगळता इतर ठिकाणी लेआऊट ठिक आहेत, असे म्हणता येणार नाही असे मत यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

        पूर्वीच्याकाळी कोळकी मुख्य गावठाण आणि २ ते ३ वस्त्या होत्या, आता कोळकीचा विस्तार  मोठ्या प्रमाणावर होत गेला असून तालुक्यात १७ सदस्य असलेल्या केवळ ३ ग्रामपंचायती आहेत, त्यामध्ये सुध्दा कोळकी मोठी ग्रामपंचायत असून कोळकी साठी अनेक पाणी पुरवठा योजना उभारण्यात आल्या मात्र वाढत्या लोकवस्ती मुळे त्या पुरेशा होत नसल्याने फेर सर्वेक्षण करुन आगामी २५/३० वर्षांसाठी पुरेशी होईल अशी एकच मोठी योजना मंजूर करुन घेऊन उभारणीचा प्रयत्न असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

        आज भूमीपूजन झालेल्या वनदेवशेरी व महादेव मळा येथील पाणी पुरवठा योजना वेगाने पूर्ण करुन घेऊन कोळकी पाणी टंचाई निवारणाचा प्रयत्न असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

       विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यात कोणत्याही गावाला पिण्याचे पाणी कमी पडू न देण्यासाठी आपण सर्वजण कायमच कार्यरत आहोत, याची ग्वाही देत कोळकीचा वाढता विस्तार पाहता योजना राबविण्यात आल्यानंतर काही दिवसांतच योजना अपुरी पडण्यास सुरुवात होत असल्याने कोळकीसाठी योजना राबविताना पुढील ३० वर्षांचा विचार करुन योजना राबिविणे गरजेचे आहे ते आपण नक्की करु असे स्पष्ट प्रतिपादन आ. दीपकराव चव्हाण यांनी केले आहे.

कोळकी आदर्शवत ग्रामपंचायत बनविण्यासाठी प्रयत्न करा : श्रीमंत संजीवराजे
    कोळकी गावांमध्ये विविध प्रश्न सातत्याने निर्माण होतात त्याचे निवारण करुन कोळकीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कोळकी ग्रामपंचायत सक्षम असण्याची आवश्यकता नमूद करीत पुढील २५/३० वर्षांचा विचार करुनच कोळकीच्या योजना राबविणे गरजेचे असून कोळकी ग्रामपंचायत सक्षम व आदर्शवत बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन करतानाच विद्यमान पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशी अपेक्षा सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.

No comments