प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्यावतीने अमर शेंडे होणार सन्मानित
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती, पुणे यांच्यावतीने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे कार्यवाह तथा नवोदित लेखक अमर शेंडे यांचा वाचनसंस्कृती समृद्ध करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जयंतीदिनी (दि.१५ जुलै) विशेष सन्मान होणार असल्याची माहिती, स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी दिली.
शुक्रवार, दि.१५ जुलै रोजी सायं.६:०० वाजता पुणे येथील एस.एम.जोशी सोशालिस्ट फौंडेशनच्या सभागृहात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पार पडणार्या या समारंभात प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांना यंदाच्या प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मानाचे वितरण होणार आहे. तसेच श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल चतुरंग प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर यांचाही यावेळी विशेष सन्मान होणार असून याच समारंभात अमर शेंडे यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अमर शेंडे गेली २० वर्षे वृत्तपत्र, साहित्य, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शेंडे यांच्या मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर आधारित ‘बाळशास्त्री’ हे चरित्र आणि ‘यशवंतराव चव्हाण विचारधन एक सुवर्ण ठेवा’ या साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी लिहिलेले ‘मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट’ यांचे जीवन चरित्र महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रकाशनाच्या वाटेवर आहे. साप्ताहिक लोकजागर दिवाळी अंक, विविध स्मरणिका, गौरव ग्रंथ आदींच्या संपादनातही शेंडे यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक विषयांवरील त्यांचे लेखन विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहे. वाचनसंस्कृतीच्या समृद्धीसाठी सुरू असलेल्या या योगदानाबद्दल अमर शेंडे यांचा हा विशेष सन्मान होणार असून याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
No comments