सासू-सुनेची फसवणूक : सोन्याचे दागिने स्वच्छ करून देतो म्हणून १२ तोळे सोन्याचे दागिने केले लंपास
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - सोन्याचे दागिने धुऊन देतो असे म्हणून सोनवडी बुद्रुक ता. फलटण येथील सासू सुनांची फसवणूक करून, हातचलाखी करून दोन अज्ञात इसमांनी १ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. प्रथम भांडी स्वच्छ करून देण्याचे प्रात्यक्षिक दाखवत - दाखवत चांदीचे दागिने व त्यानंतर सोन्याचे दागिने स्वच्छ करून देतो, असे म्हणून सोनवडी बुद्रुक येथील सासु - सुनेचा विश्वास संपादन करून, त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने घेतले व ते स्वच्छ करून देण्याचा बहाना करून, हातच्यालाखीने ते दागिने दोन अज्ञात इसमानी लंपास केले व सासु सुनेची फसवणूक केली. या फसवणुकीमध्ये अज्ञात चोरट्यांनी सुमारे १२ तोळे सोन्याच्या दागिने लंपास केले असल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. १६ जुलै २०२२ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास सोनवडी बुद्रुक ता. फलटण जि. सातारा येथील सासू व सून घरातील भांडी स्वच्छ करीत होत्या. त्यावेळी घराचे गेटसमोर दोन अनोळखी इसम मोटरसायकल वर आले व सुनेला हिंदी भाषेत म्हणाले की, आमच्याकडे भांडी घासायची पावडर आहे. मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो, असे म्हणुन ते दोन इसम घराचे गेटचे आत आले व ओट्यावर बसले. त्यातील एक इसम उंची ६ फुट, रंगाने सावळा, अंगाने जाड, काळ्या रंगाचे केस कोंबडा पाडलेला, निळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट, पायात बुट, उजव्या हाताच्या पोटरीच्या खालील बाजूस इंग्रजीमध्ये मोठ्या अक्षरात गोंदलेले आहे तो हिंदी भाषेत बोलत होता तर दुसऱ्या इसमाचे वर्णन उंची ५ फुट, गोलाकार चेहरा, अंगाने सडपातळ अंगात नेसणेस पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळी पँट, केस काळे कुरळे व लहान, पायात सॅंडल, सदर इसम काहीही बोलत नव्हता.
त्यानंतर दोघांनी त्यांच्या जवळील उजाला नावाची पावडर सुनेला व सासूबाईना दाखवली आणि म्हणाले देवाचा तांब्या आणा घासून देतो. तेव्हा सूनबाईंनी देवघरातील तांब्या सदर इसमांना आणुन दिला, तो त्यांनी स्वच्छ घासून दिला. त्यानंतर त्यांनी घरातून एक वाटी आणण्यास सांगीतली व चांदिचे काय असेल तर द्या, धुऊन देतो, असे म्हणाले, तेव्हा सूनबाईंनी पायातील पैंजण दिले व त्या अज्ञातांनी वाटीत लाल रंगाची उजाला पावडर टाकून पैंजण धुऊन दिले. त्यानंतर त्या दोघांनी सासूबाई व सुनेला सोन्याचे दागीने धुऊन देतो असे सांगीतले. नंतर सूनबाईंनी गळ्यातील मिनीगंठण व सासूबाईनी त्यांच्या गळ्यातील मिनीगंठण, त्या वाटीत टाकले, त्यावेळी त्या दोन इसमातील, एक इसम म्हणाला घरात आणखी काही सोन्याचे दागिने असतील तर आणा सर्व दागिने एकत्रित धुऊन देतो, असे म्हणाल्यावर सूनबाईंनी त्यांचे व सासूबाईचे दागिने सदर इसमांना धुण्यासाठी दिले. त्या इसमाच्या जवळ एका प्लास्टीकच्या पिशवीत लिक्वीड होते, ते लिक्वीड वाटीत टाकून दागिने वाटीत बुडवून बाहेर काढले व आता हे दागीने थोडा वेळ सुकू दया, असे म्हणुन त्या इसमाने सूनबाईला कुकर व हळद घरातून आणणेस सांगितले. कुकर मध्ये पाणी घ्यायला सांगीतले व त्यामध्ये चार-पाच चमचे हळद टाकणेस सांगितली. त्यानंतर कुकरमधील पाणी गरम करा असे म्हणुन सर्व दागिने गंठण, नेकलेस, चैन व दोन मण्यातील मिनीगंठण कुकरमध्ये टाकले. हिंदी भाषा बोलणाऱ्या इसमासोबत काळ्या रंगाची, चौकोनी आकाराची बॅग होती ती बरोबर घेऊन, तो हिंदी भाषिक सुनबाई सोबत त्यांच्या स्वयंपाक घरात गेला. त्यानंतर गॅसवर कुकर ठेवला व त्याने बॅगमधील एक रूमाल हातात घेऊन व कुकर मधील एक - एक दागिना काढून रुमालाने पुसून, कुकरमधील पाण्यात बुडवत होता. असे त्याने सर्व दागीने चार-पाच वेळा पाण्यातून बुडवून रुमालाने पुसूले व त्यानंतर त्याने कुकरचे झाकून लावले व १० मिनीटानंतर उघडा असे म्हणुन तो इसम घरातून निघुन बाहेर गेला. व लगेच दोन्ही इसम मोटरसाकलवर बसून निघून गेले. त्यानंतर सूनबाईंना शंका आल्याने त्यांनी लगेच कुकरमधील पाण्यात हात घालून पाहीले असता, त्यात दागिने दिसले नाहीत. कुकरमध्ये एकही दागिना न्हवता. त्यानंतर सुनबाई व सासूबाई यांनी गेटच्या बाहेर जाऊन सदर इसमांना पाहिले असता सदरचे इसम दिसले नाहीत. ते दुचाकीवरून पसार झाले होते.
अशा रीतीने भांडी स्वच्छ करून देण्याचे प्रात्यक्षिक दाखवत - दाखवत चांदीचे दागिने व त्यानंतर सोन्याचे दागिने स्वच्छ करून देतो असे म्हणून दोन्ही अज्ञातांनी सासूबाई व सुनबाई यांचा विश्वास संपादन करून, त्यांचे १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. तरी नागरिकांनी दक्षता घ्यावी व अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे व कोणाही अज्ञात - अनोळखी इसमास आपल्या घरामध्ये प्रवेश देऊ नये. व त्याच्यावर विश्वास ठेवू नये.
No comments