एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आहे खरी! उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आहे बरी!! ; फलटण विधानसभा रिपाई लढवणार - ना.रामदास आठवले
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ - फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघाची जागा ही रिपाईच्या कोट्यातील असून, २०२४ मध्ये ती जागा रिपाई पक्ष लढवणार असल्याचे सांगतानाच राज्यातील भाजपा - शिंदे सरकार मध्ये मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळावे व राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये एक जागा रिपाईला मिळावी अशी मागणी केली असल्याचे व ती नक्की पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तर टू थर्ड मेजॉरिटी ही एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
दलित पॅंथरचे कार्यकर्ते दिवंगत चंद्रकांत अहिवळे यांच्या शोकसभेसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे फलटणला आले होते, शोक सभेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, रिपाई प. महाराष्ट्र अध्यक्ष शहाजी कांबळे, सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, मधुकर काकडे, विजय येवले, मुन्ना शेख, राजू मारुडा, संजय निकाळजे, अभिलाष रवींद्र काकडे, सतीश अहिवळे, दीपक अहिवळे, लक्ष्मण अहिवळे, तेजस काकडे, मारुतराव मोहिते, बाबा लोंढे, सागर लोंढे, राहुल काकडे, नीलेश अहिवळे उपस्थित होते.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत बोलताना ना. रामदास आठवले म्हणाले की, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे अत्यंत चांगले काम करेल, लवकरच पावसाळी अधिवेशन होणार आहे आणि त्या अगोदर मंत्रिमंडळ विस्तार देखील होणार आहे. रिपब्लिकन पक्षाला या मंत्रिमंडळात एक मंत्रिपद मिळावे अशी आम्ही मागणी केली आहे, त्याचबरोबर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी एक जागा ही रिपाईला मिळावी. अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, नक्कीच या मागणीचा विचार करून आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आहे खरी !
उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आहे बरी !!
अशी काव्यत्मक मिश्किल टिपणी ना. रामदास आठवले यांनी केली.
मी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांना सांगितले होते की, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचे असेल, तर आपण बीजेपी सोबत यावे, त्यांनी बीजेपी सोबत येणं आवश्यक होतं, परंतु त्यांनी त्याला फार वेळ लावला, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाबंड झालं, जर मी सांगितले, त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला असता, तर अशा पद्धतीची फूट आपल्याला पाहायला मिळाली नसती, निर्णयाला उशीर लावल्यामुळेच शिवसेनेमध्ये फूट पडली असल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या आरक्षित जागे बाबत बोलताना, ना. रामदास आठवले यांनी सांगितले की, फलटण कोरेगाव मतदार संघाची जागा ही रिपाईच्या कोट्यातील असून, २०२४ मध्ये ही जागा रिपाई लढवणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन, देशाच्या उच्च पदावर आदिवासी समाजाला संधी दिली आहे, उद्या द्रौपदी मूर्मु संसद भवन येथे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. मागील ७५ वर्षात आदिवासी समाजाला हा न्याय मिळाला न्हवता, आणि तो न्याय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, त्या अगोदर देखील त्यांनी राष्ट्रपती कोविंद यांच्या रूपाने दलित समाजाला न्याय दिला होता. आदिवासी समाज हा दुर्लक्षित व उपेक्षित समाज आहे, या समाजाला उच्चपद देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे, इतिहासामध्ये एक तारा द्रौपदी मुर्मू यांच्या नावाने चमकला आहे. त्यामुळे आदिवासी समाजामध्ये चैतन्याचा वातावरण आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.
No comments