सामान्यांसाठी ‘सहकार’ उभा केलेले सहकार महर्षि हणमंतराव पवार
एखादी व्यक्ती जावुन 25 वर्षे झाली तरी ती व्यक्ती आजही आपल्यामध्ये असावी असे वाटते. तेव्हा ती एक कौंटुबिक भावना असते. पण जेव्हा दरवर्षी एखाद्या व्यक्तीची पुण्यतिथी असते त्यावेळी ती व्यक्ती आजही हवी होती असे अनेकांना वाटते त्यावेळी ती सामूहीक व सामाजिक भावना असते. त्यामध्ये हणमंतराव पवार आहेत. दि.17 जुलै रोजी त्यांच्या पुण्यतिथीचा रौप्य महोत्सव (1997-2022) असून त्यांच्या जयंतीचा अमृतमहोत्सवही (1945-2020) नुकताच संपन्न झाला हा एक योगायोगच आहे. म्हणुन 17 जुलै पुण्यतिथी दिवशी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा मागोवा सहकारातील सध्याच्या परिस्थितीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरावा अशी अपेक्षा आहे.
पत्रकार या नात्याने आणि मैत्रीच्या साथीने माझे त्यांच्याशी सन 1972 पासून संबंध आले होते. 10 मे 1972 पासून मी पत्रकारीतेत असुनसुध्दा स्वत:चे सातारा जिल्हयातील पहिले मराठी मासिक ‘विचारसंगम’ सुरू केले होते. तेव्हापासून मी त्यांना सहकारातील कर्तृत्वाचा एक उमेदीचा शिल्पकार या भुमिकेतून पाहत होतो. मी त्यावेळी दै.विशाल सहयाद्री (पुणे) व दै.संध्या (पुणे) चा फलटण प्रतिनिधी म्हणुन काम करीत होतो. पुढे 17 मार्च 1980 पासुन मी स्वत:चे सा.लोकजागर वृत्तपत्र सुरू केले व पुढे नवशक्ती, लोकसत्ता, केसरी, तरूण भारत, ग्रामोध्दार यामधून बातमीदार म्हणून व नंतर मुक्त पत्रकार म्हणून आजपर्यत कार्यरत आहे.
सन 1980-81 च्या सुमारास मी सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचा सरचिटणीस असताना अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक असलेल्या ‘शिवसंदेश’ कार हरिभाऊ निंबाळकर यांच्यामुळे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 28 वे अधिवेशन फलटण येथे आम्ही दि.13,14,15 जून 1982 रोजी जिल्ह्यातील पत्रकारांनी आयोजित केले होते. त्यावेळी फलटण तालुक्याचे आमदार व सातारा जिल्हयाचे एक नेते डॉ.कृष्णचंद्र भोईटे यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यातील सहकारी संस्था होत्या.त्यात श्रीराम सहकारी साखर कारखाना होता व त्याचे अध्यक्ष हणमंतराव पवार होते. हे अधिवेशन त्यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या आवारात ‘‘न भूतो न भविष्यती’’ अशा थाटात संपन्न झाले होते. डॉ.भोईटे यांच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्थांचे अध्यक्ष हणमंतराव पवार, सुभाषराव शिंदे, डॉ.विजयराव बोरावके, विश्वासराव निंबाळकर या तरूण नेत्यांनी पत्रकारांचे हे अधिवेशन अत्यंत परिश्रमाने यशस्वी केले होते. त्यामध्येही हणमंतराव पवार यांच्या नेतृत्वाचे, कल्पकतेचे दर्शन झाले होते. परिचयही अधिक दृढ झाला होता.
सन 1979 हे साल हणमंतराव पवार यांच्या आयुष्यातील महत्वाचे ठरले. कारण संपूर्ण महाराष्ट्रांत यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याची गाजलेली निवडणूक झाली. त्यामध्ये डॉ. कृष्णचंद्र भोईटे व कारखान्याचे संस्थापक चेअरमन श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या पॅनेलमधून हणंमराव पवार संचालक पदी निवडुन आले आणि पहिल्याच वर्षी ते या कारखान्याचे अध्यक्ष झाले. ते अध्यक्ष होत असताना फलटण तालुक्यात फार मोठा राजकीय संघर्ष झाला. कारण संस्थापक चेअरमन श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर व आताही तेच अध्यक्ष होणार असा जाणकरांचा होरा असताना, अचानकपणे हणमंतराव पवारांसारख्या शेतकरी कुटूंबातील कार्यकर्त्याला चेअरमनपदी संधी मिळाली. पण या वादळासही त्यांनी यशस्वीरित्या तोंड दिले. त्यामुळे श्रीराम कारखान्याचे अध्यक्ष झाल्यानंतर खर्या अर्थाने त्यांच्या कार्याला गती आली व त्यांच्या नेतृत्वाचे पैलू तालुक्याला दिसू लागले. सर्वात महत्वाचे म्हणजे हा कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे ही भावना सर्वप्रथम त्यांनी सभासदांच्यात निर्माण केली. सर्व सभासदांना कारखान्यात निमंत्रित करून कारखान्यातर्फे सुरू असलेली विकास कामे दाखविण्याचे प्रात्यक्षिक फक्त त्यांनीच करून दाखविले. ऊसाची लागवड करण्यासाठी व ऊसाचे टनेज दर्जेदार पध्दतीने वाढविण्यासाठी त्यांनी गट पध्दतीने शेतकर्यांचे विशेष प्रशिक्षण आयोजित केले.संशोधनाचा फायदा ऊस उत्पादकांना मिळावा यासाठी उस उत्पादकांच्या बांधापर्यंत जावून त्यांनी नव्या संशोधनाचे वाण शेतकर्यांनी लावावे यासाठी परिश्रम घेतले. त्याआधी त्यांनी दूध संघाच्या माध्यमातून खेडोपाडी दूध सोसायट्या निर्माण करून दुधाचा ताजा पैसा शेतकर्यांना मिळेल यासाठी प्रयत्न केले. त्याच धर्तीवर शेतकर्यांना जोडधंदा मिळावा म्हणून त्यांनी अलगुडवाडीजवळ मांगोबाच्या माळावर सहकारी कुक्कूटपालन संस्था सुरू केली. कारखान्यातून शेतकर्यांसाठी उपसा जलसिंचन योजना, ब्लास्टिंग मशिन योजना, कंपोस्ट खत योजना, कृषि अवजार योजना इत्यादी अनेक योजना राबविल्या. विशेषत: फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात म्हणजेच दुप्काळी भागात त्यांनी उस उत्पादनासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या. या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सहकारी मोटार चालक संघ, सहकारी पशुखाद्य उत्पादक संस्था, उस तोडणी व वाहतूक संस्था याही सुरू केल्या. त्यामुळे कार्यकत्यांचे एक मोहोळच त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले होते. गावोगावच्या विकास सोसायट्या, पतसंस्था यांच्या माध्यमातूनही त्यांनी कार्यकर्त्यांना आर्थिक आधार दिला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेवर अटीतटीच्या निवडणूकीत ते संचालक म्हणून निवडून गेले आणि खर्या अर्थाने बँकेच्या योजना शेतकर्यांच्या शेतापर्यंत त्यांनी पोहचविल्या.
श्रीराम बझारची स्थापना
तालुक्याच्या विकासासाठी संस्थांचे व कार्यकर्त्यांचे जाळे विणत असताना त्यांच्या लक्षांत आले की, शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर सर्व क्षेत्रातील ग्राहक आहे. म्हणून 1986 साली त्यांनी श्रीराम बझार सुरू केला. या बझारमधून कारखान्यातील ऊस उत्पादक सभासदांना व गावोगावच्या अन्य शेतकर्यांना सर्व प्रकारचा जीवनावश्यक माल, वस्तू, कृषि, औद्योगिक अवजारे इत्यादी मिळण्यासाठी एका छताखाली सोय केली. आज श्रीराम बझार म्हणजे फलटण तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील एक देखणे शिल्प झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर अशा या बझारच्या आज फलटण, तरडंगाव, लोणंद, दहिवडी, पवारवाडी, गोंदवले बु., मलठण, महात्मा फुले शॉपिंग सेंटर फलटण, कोरेगांव, म्हसवड, शिरवळ, व कोळकी या ठिकाणी यशस्वी शाखा कार्यरत आहेत. शिस्तबध्द व चोख व्यवहार, आर्थिक पारदर्शकता हे या बझारचे वैशिष्ठ्य आहे. आणि हणमंतरावांनी यासाठी जीवापाड प्रयत्न केले. आज तालुक्याच्या सहकार क्षेत्राची अवस्था पाहिल्यानंतर श्रीराम बझार सहकारातील आदर्श संस्था असे मानले जाते. त्यांच्यानंतर त्यांचे बंधू महादेवराव आबा पवार (मार्गदर्शक संचालक) व जितेंद्र पवार (विद्यमान चेअरमन) व दिलीपसिंह भोसले ( विद्यमान उपाध्यक्ष) यांनी हा बझार हणमंतरावांच्या विचाराने अत्यंत चांगल्या पध्दतीने चालवून त्यांचा वसा कृतिशील पध्दतीने जपला आहे. सन 1986 साली अवघ्या रू.76.00 लाखाच्या उलाढालीवर हणमंतरावांनी धाडसाने सुरू केलेल्या या बझारची आजची उलाढाल रू.65.00 कोटी एवढी आहे. यावर्षी दि.31.03.2022 अखेरचा बझारला रू.76.23 लाख नफाही झाला आहे. ख-या अर्थाने श्रीराम बझार हे हणमंरावांच्या परिश्रमाचे दूरदृष्टीने कृतीशील सहकार क्षेत्रातील सुंदर स्मारक आहे.
मुख्यमंत्री जेवताना त्यांची परवानगी घेतली
हणमंतरावांचा जनसामान्यांशी, साखर कारखानदारीतील मात्तबरांशी, मंत्रालयातील मंत्री, अधिकारी यांचेशी उत्तम जनसंपर्क होता. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतरावदादा पाटील यांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध होते. त्यामुळे तालुक्याच्या विकासाचे कोणतेही काम असो, त्यासाठी ते या कामाचा सर्व स्तरावर सातत्याने पाठपुरावा करायचे. कामासाठी प्रवास, मग तो पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर असो वा राज्यात कोठेही असो, यासाठी त्यांना कधीच कंटाळा नसायचा. कारण हाती घेतलेल्या कामावर त्यांचे पहिले प्रेम असायचे.
एकदा सन 1983 मध्ये मी डॉ.कृष्णचंद्र भोईटे यांचेकडे स्वतंत्र शिक्षण संस्था असावी व त्या माध्यमातून तालुक्यात व्यवस्थापनशास्त्र, इंजिनिअरिंग, पॉलीटेक्नीक, आय.टी.आय. अशा रोजगाराभिमुख शाखा काढायच्या असा प्रस्ताव मांडला. डॉ.भोईटे यांनी हणमंतराव पवार, सुभाषराव शिंदे, डॉ.विजयराव बोरावके, विश्वासराव निंबाळकर या त्यांच्या बिनीच्या शिलेदारांशी चर्चा केली व आम्ही विद्या प्रसारक संस्था स्थापन केली. त्यामार्फत प्रथम विनाअनुदानीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा पहिला निर्णय झाला. कारण त्यावेळी मुख्यमंत्री वसंतरावदादा पाटील यांनी तांत्रिक, अभियांत्रिकी व वैद्यकीय, व्यावसायिक शिक्षण संस्थांना विनाअनुदावर शासकीय मान्यता देण्याच्या धाडसी निर्णय घेतला व सर्व सहकारी साखर कारखान्यांनी यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले होते. एक प्रकारे ही एक ऐतिहासिक शिक्षण क्रांतीच होती. त्याला अनुसरून हे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आय.टी.आय) सुरू करण्याचा प्रस्ताव घेवुन हणमंतराव मुंबईला गेले होते. बरोबर या संस्थेचा कार्यवाह म्हणून मलाही त्यांनी नेले होते. आम्ही मुंबईला थेट वसंतदादांच्या निवासस्थानीच ‘वर्षा’वर दुपारी 2.00 वाजता पोहोचलो होतो. दादा त्यावेळी भोजनगृहात भोजन घेत होते. परंतु हणमंतराव पवार आलेत असा निरोप दादांच्या स्वीय सचिवांनी दादांपर्यत पोहचविला. 10 मिनिटातच दादा जेवत होते, त्या टेबलापाशी आम्ही पोहोचलो. दादांनी उत्सुकतेने सर्वात प्रथम विचारले की, ‘‘तुमचा साखर कारखाना कसा काय चाललाय? काही अडचण नाही ना?’’ या चर्चा होत असताना दादांनी हणमंतरावांना, ‘‘जेवणार कां?’’ असेही विचारले. पण हणमंतरावांनी नाही म्हटल्यांवर दादांनी दोन सफरचंद तरी खा म्हणत सफरचंद खायला दिली. जेवण संपतानाच दादांनी विचारले, ‘‘आणखी काय?’’ तर लगेच हणमंतरावांनी आय.टी.आय. परवानगीचा प्रस्ताव समोर ठेवला. दादा म्हणत होते की, ‘‘अरे, हे चांगलं काम करताय, आपल्या ग्रामीण भागातील पोरांना याचा खूप फायदा होणार आहे.’’ असं म्हणत जेवण झाल्यानंतर लगेचच दादांनी या प्रस्तावाला मान्यतेचे आदेश सचिवांना (तंत्रशिक्षण) दिले. हा असा एकच मुख्यमंत्री होता की कार्यकर्ते त्यांना कुठेही भेटू शकत होते. रितसर शासन परवानगी, केंद्र सरकारची परवानगी आल्यानंतर फलटण तालुका सहकारी दूध संघाच्या आवारात 1 ऑगस्ट 1984 पासून हे आय.टी.आय.सुरू सुध्दा झाले.
दुसरी एक अशीच आठवण मागासवर्गीय दुर्बल घटाकांसाठी काम करण्याच्या हणमंतराव पवारांच्या कार्यपध्दतीबाबतची. मी त्यावेळी महाराष्ट्रातील नंदीबैल वाल्यांच्या संघटनेसाठी काम करत होतो. हे लोक विशेषत: त्यांच्या बायका डोक्यावर अॅल्युमिनीयम, तांबा, पितळ, स्टीलची भांडी घेवून खेडोपाडी भांडी विक्री करत असत. त्यांची एक सहकारी संस्था मी दे.भ.रत्नाप्पा आण्णा कुंभार व श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने सुरू केली होती. या सर्व नंदीबैलवाल्यांना संघटीत करून भांड्यांची मोड घेवून भांडी तयार करण्याचा कारखाना प्रस्तावित होता. माइया आग्रहास्तव दे.भ.रत्नाप्पा कुंभार यांच्या विनंतीवरून श्रीमंत मालोजीराजे यांनी त्यांच्या घराण्यातील फलटणजवळ कोळकीमधील इरिगेशन बंगल्या जवळ 2 एकर जमीन बक्षिसपत्राने भांडी कारखाना सहकारी संस्थेला दिली होती. तोपर्यत भांडी खरेदी विक्री करण्यासाठी श्रीराम कारखान्याने नव्याने कारखान्याच्या बाहेर सुरू केलेल्या शॉपींग सेंटरमधील 1 गाळा या लोकांसाठी द्यावा अशी विनंती मी हणमंतराव पवारांना केल्यावर त्यांनी तात्काळ ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर 1 गाळा या लोकांना दिला. एवढेच नव्हे तर खरेदी विक्रीचा शुभारंभ करायलाही ते स्वत: आवर्जून आले होते.
फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी, दुष्काळी भाागातील शेतकर्यांसाठी मोठ्या प्रमाणावर विहीरी, नालाबंधारे, के.टी.वेअर्ससाठी हणमंतरावांनी खूपच कष्ट घेतले. सुभाषराव शिंदे यांनी सुरू केलेल्या नीरा देवघर धरणाच्या आंदोलनातही त्यांनी सहकार्य केले. विकास सोसायट्या, दूध संस्था, गावोगावी तरूण मंडळे यासाठीही त्यांचे सतत प्रयत्न असायचे. त्यामुळे 1979 ते 1997 या काळात हणमंतरावांचे राजकीय वर्चस्व वाढले होते. हजारो कार्यकर्त्यांचा संच विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी तयार केला होता. त्यावेळी एक काळ असा होता की, फलटण तालुक्याच्या राजकारणात हणमंतराव पवार यांचा स्वत:चा असा गट व त्यांचा दबदबा होता. पण दुर्दैवाने बेंदरादिवशी ऊस उत्पादक शेतकर्यांना ऊसाचे पेमेंट मिळावे या कामासाठी व्यस्त असताना सांगलीला राज्य सहकारी बॅकेचे अध्यक्ष विष्णुअण्णा पाटील यांचेशी चर्चा करून येत असतानाच अष्ट्याजवळ (आकाशवाणी केंद्रालगतच) त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यातच ते गेले. दुसर्या दिवशी ते पेमेंट घेवूनच येणार होते. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत ते शेतकर्यांच्या, तालुक्याच्या सेवेत होते. ‘‘हणमंतराव पवार’’ हा नवाक्षरी मंत्र फलटण तालुक्याच्या विधायक राजकीय पटलावरून अस्तंगत झाला. विकासाच्या अनेक संस्था मागे ठेवून ते गेले.
नाही चिरा नाही पणती !
तरीही तिथे कर माझे जुळती !!
No comments