भूसंपादन भरपाई न मिळाल्यास रस्त्याचे काम बंद करणार व दबाव आणल्यास आत्मदहन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग क्र. ९६५ ची संपादित केलेल्या क्षेत्राची भू बाधित शेतकऱ्यांना राहीलेली बाधित क्षेत्राची नुकसान भरपाई मिळाली नाही तर रस्त्याचे काम बंद पाडणार आणि जर प्रशासनाने आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही भु बाधित शेतकरी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सह कुटूंब आत्मदहन करणार असल्याचा इशारा बाधित शेतकरी महेश श्रीकृष्ण दाते, सौ. संगिता सुरेश नाळे यांनी प्रशासनास दिला आहे.
आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग क्र. ९६५ ची संपादित केलेल्या क्षेत्राची भू बाधित शेतकऱ्यांना राहीलेली बाधित क्षेत्राची नुकसान भरपाई मिळावी याकरिता महेश श्रीकृष्ण दाते, सौ. संगिता सुरेश नाळे यांनी उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप , उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव व फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला निवेदन देऊन, नुकसानभरपाई न मिळलेस, रस्त्याचे काम बंद करण्याचा व आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
संबंधितांना दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, मौजे सस्तेवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथील स.नं. ४७ मधील क्षेत्र संपादित झाले असुन सदरचे क्षेत्र जमीन ही भोगवटादार वर्ग-१ ची आहे. तरी आमच्या भु बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर सक्षम अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) क्र. १६ सातारा यांचे कार्यालयाने नुकसान भरपाई रक्कम सील केली आहे, ती रक्कम भु बाधित शेतकऱ्यांना त्वरित मिळावी व या बाधित क्षेत्राचा नजराना फेरफार, सातबारा उतारा, खाते उतारा, कागदपत्र सोबत जोडत आहे. सदर कागदपत्रे ही शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळणेसाठी जोडलेली आहे.
तरी आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही विनंती. भू बाधित शेतकऱ्यांना राहीलेली बाधित क्षेत्राची नुकसान भरपाई मिळाली नाही तर आम्ही कुठल्याही क्षणी रस्त्याचे काम बंद पाडणार आणि जर प्रशासनाने आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही भु बाधित शेतकरी उपविभागीय अधिकारी (प्रांत ऑफिस) समोर सह कुटूंब आत्मदहन करणार व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची पुर्ण जबाबदारी महसुल खाते व प्रशासन यांची राहील.
No comments