फलटण तालुक्यात पुरेशा पावसा अभावी खरीप पेरण्या खोळंबल्या
फलटण दि. १५ : महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाने थैमान घातले असून ओढे, नद्या, नाले यांना आलेला पूर, अति पाऊस यामुळे एकीकडे जनजीवन विस्कळित होत असताना फलटण तालुक्यात मात्र वार्षिक सरासरीच्या २५ टक्के पेक्षाही कमी पाऊस झाला असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.
फलटण तालुका कृषी हवामान विभागाच्या अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असून तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ६२२.२४ मि. मी. असून दि. १५ जुलै पर्यंत या तालुक्यात सरासरी केवळ १२५.१० मि.मी. पाऊस झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी दिली आहे.
खरीप बाजरी पेरा अवघा ४६ %
फलटण तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्रापैकी ४९६७ हेक्टर म्हणजे ४६ % क्षेत्रावर खरीप बाजरीचा पेरा झाला असून आगाप पेरणी पीक फुटवे फुटण्याच्या व वाढीच्या अवस्थेत असून अद्याप ६४ % क्षेत्रावर पेरणी बाकी असल्याचे तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. पावसाने उघडीप दिल्याने उर्वरित बाजरीच्या पेरण्यांना वेग आला असून या सप्ताहा अखेर पेरणी क्षेत्र ६०/६५ टक्क्या पर्यंत वाढण्याची शक्यता तालुका कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मक्यावर अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव
मका जवळपास ८० % क्षेत्रावर पेरणी झाली असून पेरणी झालेले क्षेत्र २८५१ हेक्टर असून आगाप पेरणी क्षेत्र वाढीच्या अवस्थेत आहे, मात्र या पिकावर अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांना पीक संरक्षणाबाबत योग्य सूचना व मार्गदर्शन कृषी खात्याच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी सांगितले आहे.
उन्हाळी भाजीपाला व टोमॅटो जोमात
तालुक्यात उन्हाळी भाजीपाला ८३५ हेक्टरवर, उन्हाळी टोमॅटो १३७ हेक्टरवर असून दोन्ही पिके समाधानकारक स्थितीत आहेत. या पिकांची काढणी स सुरु आहे.
कापूस हे पांढरे सोने एकेकाळी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान होते, मात्र २०/२५ वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर आलेल्या कीड रोगाने येथील शेतकऱ्यांचे हातातून हे पांढरे सोने हिरावून घेतल्याने शेतकरी नाराज होता, गेल्या ३/४ वर्षांपासून त्याने हंगाम बदलून कापूस लगणीचे धाडस केले आणि तो यशस्वी झाल्याने आता टप्याटप्प्याने पुन्हा कापूस लागण सुरु झाली आहे. यावर्षी आतापर्यंत ५४८ हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागण झाली आहे. आगामी पेरा पाती लागण्याच्या, काही ठिकाणी उगवण्याच्या अवस्थेत आहे.
सोयाबीन समाधानकारक स्थितीत
सोयाबीन ४०१ हेक्टरवर पेरा झाला असून काही ठिकाणी उगवण्याच्या तर काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत पीक समाधानकारक असल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
१८९ हेक्टरवर कडवळ पेरणी झाली असून पीक समाधान कारक स्थितीत आहे.
डाळिंबावर कीड रोगाचा प्रादुर्भाव
फलटण तालुक्यात १७१६.०३ हेक्टर फळबागांचे सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी ६६५.७० हेक्टरवर डाळिंब आणि ११६ हेक्टरवर द्राक्ष बागा आहेत. डाळिंब बागांपैकी काही क्षेत्रावर आंबे बहार धरला असून त्यावर सुरसा या किडीचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात आहे, तर काही ठिकाणी फांदी मर व तेल्या रोगाचा प्रादुर्भाव असल्याने कृषी खात्याच्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांचे माध्यमातून कीड रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
द्राक्ष बहार धरलेल्या क्षेत्रावर काडी तयार होत असून तालुक्यातील द्राक्ष बागा उत्तम स्थितीत आहेत.
No comments