Breaking News

सातारा शहरातील 11 क्षेत्र व ग्रामीण भागातील 185 रास्त भाव दुकानांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध

Manifesto published for 185 fair price shops in 11 areas and rural areas of Satara city

    सातारा  सातारा शहर व जिल्हा ग्रामीणमधील सध्या रद्द असलेले, यापुढे रद्द होणारे, राजीनामा दिलेले व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाचे तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाचे अशी सातारा जिल्ह्यातील 185 गांवे व शहरातील 11 क्षेत्रांसाठी रास्तभाव दुकाने मंजूर करण्यात येणार आहेत. त्यासाठीचे अर्ज 31 जुलैपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

    रास्तभाव, शिधावाटप दुकान परवाने मंजूर करण्याबाबत राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या 6 जुलै 2017 शासन निर्णयानुसार हा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या प्राथम्यक्रमानुसार रास्तभाव दुकाने मंजूर करावयाचे आहेत. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या 2 फेब्रुवारी 2022 च्या शासन परिपत्रकानुसार रास्तभाव दुकान मंजूर करण्यासाठी वर्षभराचा सुधारीत सहामाही कालबद्ध कार्यक्रम व कालावधी ठरवून देण्यात आलेला आहे. त्यानुसार सातारा जिल्हा शहरी व  ग्रामीणमधील स्वस्त धान्य दुकान परवाने मंजूरीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

  त्यानुसार कराड तालुक्यात 5 गावे, खटाव तालुक्यातील 18 गावे, महाबळेश्वर- 20 गावे, वाई- 18 गावे, सातारा- 26 गावे, कोरेगांव- 34 गावे, पाटण- 49 गावे, खंडाळा- 14 व फलटण तालुक्यातील 1 गाव असे एकूण 185 गावातील व सातारा शहरातील 11 क्षेत्रांत   स्वस्त धान्य दुकान परवाने मंजूर करण्यात येणार आहेत.

    जाहीरनामा ज्या भागासाठी प्रसिद्ध केलेला आहे त्याच भागासाठी, क्षेत्रातील ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास, महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था याप्रमाणे प्राथम्यक्रम असून या घटकांनी रास्तभाव दुकानासाठी स्वतंत्र अर्जाद्वारे मागणी करावी.

    अर्ज संबंधित तहसीलदार यांच्या कार्यालयात 05/- रुपये किमतीला उपलब्ध होतील. अर्जातील अटी, शर्ती, कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज 31 जुलै 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित तहसिल कार्यालयात सादर करावेत.

    शासन निर्णयानुसार इच्छुक संस्था, गट यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधीत तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेमध्ये मुदतीत अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा,यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

No comments