पँथर चंद्रकांत अहिवळे यांचे निधन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दलित पँथरपासून कार्यरत असलेले फलटणचे पँथर चंद्रकांत अहिवळे यांचे अल्पशा आजाराने सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळ आज एका धडाडीच्या नेतृत्वास मुकली आहे. त्यांच्या निधनाने वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
फलटण येथे दलित पँथरची स्थापना करताना, चंद्रकांत अहिवळे यांचा यामध्ये सिंहाचा वाटा होता. चंद्रकांत अहिवळे यांनी मंगळवार पेठेतील युवकांना एक दिशा देण्याचे व युवकांचे संघटन करण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी काम करताना त्यांनी एक शिस्तबद्ध व आदर्शवत जयंती काढून एक आदर्श निर्माण केला. चंद्रकांत अहिवळे हे सातारा जिल्हा परिषद मध्ये कार्यरत होते, त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. समाजात काम करताना आंबेडकरी चळवळीत त्यांनी मोठे योगदान दिले असल्याची भावना दैनिक गंधवार्ताचे संस्थापक संपादक शाम अहिवळे यांनी व्यक्त केली.
फलटणच्या आंबेडकरी चळवळीला विधायक विकासाकडे व संघटनात्मक व रचनात्मक कार्याकडे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत अहिवळे होय. त्यांच्या जाण्यामुळे समाजात निश्चितच एक पोकळी निर्माण झाल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते व फलटण भारतीय दलित पॅंथरचे माजी अध्यक्ष दत्ता अहिवळे यांनी व्यक्त केली आहे.
No comments