फलटण पंचायत समिती आरक्षण सोडत गुरुवार दि. २८ रोजी

Phaltan Panchayat Committee  reservation on Thursday

     फलटण दि. २७ : सातारा जिल्हा परिषद/पंचायत समिती आगामी पंचवार्षिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सातारा यांनी सातारा जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सर्व ११ पंचायत समित्यांची आरक्षणे निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यक्रम जाहीर केला आहे.

       त्यानुसार फलटण पंचायत समिती १८ सदस्य पदांसाठी आरक्षण सोडत गुरुवार दि. २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नगर परिषद प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन पाठीमागील नगर परिषद नवीन सभागृहात आयोजित करण्यात येत असून सर्व संबंधीतांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार समीर मोहन यादव यांनी केले आहे.

     फलटण पंचायत समिती मध्ये ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गण नव्याने तयार करण्यात आले आहेत. पूर्वी ७ गट आणि १४ गण होते, त्यामध्ये २ गट व ४ गणांची वाढ झाली आहे.

     पाडेगाव, तरडगाव, साखरवाडी (पिंपळवाडी),  जिंती, सस्तेवाडी, सांगवी, विडणी, राजाळे, आसू, गुणवरे, बरड, दुधेबावी,  कोळकी, गिरवी, वाठार निंबाळकर, सुरवडी, सासवड, हिंगणगाव हे १८ गण असून त्यासाठी गुरुवार दि. २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याचे तहसीलदार समीर यादव यांनी सांगितले आहे.

         राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार राज्यातील २५ जिल्हा परिषद आणि २८४ पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणूकांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसह) आरक्षण निश्चितीसाठी दि. २६ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार दि. २८ जुलै रोजी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी जिल्हा परिषद गटांचे आणि तालुकास्तरावर तहसीलदार पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करतील.

    दि. २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी स्तरावर आरक्षणाची प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध करतील. दि. २९ जुलै ते दि. २ ऑगस्ट दरम्यान त्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती/सूचना दाखल करता येतील. त्यावर योग्य निर्णय घेऊन दि. ५ ऑगस्ट रोजी गट व गणांचे आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

No comments