13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
सातारा दि.12 : सातारा मुख्यालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात शनिवार दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 वा. राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी दिली आहे.
या लोकअदालतीमध्ये धनादेश न वटलेले प्रकरणे, वादपूर्व प्रकरणे, मोटार अपघात दावे, थकीत कर्जाची प्रकरणे, वैवाहिक वाद, थकीत ग्रामपंचायतीची मालमत्ता कर व पाणी बिलाची प्रकरणे इत्यादी प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी केले आहे.
लोकन्यायालयाचे फायदे : खटल्यामध्ये साक्षी-पुरावा, उलट तपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात, निकाल झटपट लागतो. लोकन्यायालयाच्या निवड्याविरुद्ध अपील नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. लोकन्यायालयात निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने ना कोणाचा जय होतो ना कोणाची हार होते त्यामुळे निवडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकात द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणारे निवाड्यांची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. वेळ आणि पैसा दोन्हींचीही बचत होते व लोक न्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते.
No comments