शहीद जवान गजानन मोरे यांना पुष्पचक्र अर्पण करुन मंत्री शंभूराज देसाई यांचे अभिवादन
सातारा : कारगिल युध्दात शहीद झालेले गजानन मोरे यांच्या अर्ध पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी अभिवादन केले.
भुडकेवाडी ता. पाटण येथे शहीद जवान गजानन मोरे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे, ग्रामविकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे, तहसिलदार रमेश पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, मोरे कुटुंबीय, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, कारगिल युध्दात शहीद झालेले गजानन मोरे यांना कायम स्मरणात ठेवले पाहिजे. देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थ पडलेल्या शहीद गजानन मोरे यांच्या कुटुंबासाठी सातारा शहराजवळ चार गुंठे जागा देण्याचा प्रयत्न करु. जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनास सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
तारळे विभागातील विविध गावांच्या विकासाला निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. विकास प्रक्रिया ही कधी न थांबणारी प्रक्रिया असून शासन हे सर्वसामान्यांचे असून यापुढेही तारळे परिसरातील गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशीही ग्वाही श्री. देसाई यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
No comments