Breaking News

विडणी येथे दुचाकींचा समोरासमोर अपघात : रस्त्यावर पडलेला चालक ट्रेलरच्या चाकाखाली ; १ ठार, २ जखमी

Two-wheeler accident at Vidni: Driver lying on road under trailer wheel; 1 killed, 2 injured

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७  - विडणी ता. फलटण गावचे हद्दीत फलटण - पंढरपूर रोडवर, निसर्ग हायटेक नर्सरी जवळ फलटण बाजूकडून येणाऱ्या मोटारसायकल चालकाने मोटारसायकल भरधाव चालवत, रॉंग साईडला जाऊन, पुढून येणाऱ्या  दुचाकी वाहनास समोरून जोरात धडक दिली, या धडकेमुळे फलटण बाजूकडून येणारा चालक उडून रस्त्यावर पडला असता, पुढून येणाऱ्या १८ चाकी ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असून, दुसऱ्या दुचाकी वाहनावरील दांपत्य जखमी झाले आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ३.१० वाजण्याच्या सुमारास मौजे विडणी ता. फलटण गावचे हद्दीत, फलटण ते पंढरपूर जाणाऱ्या रोडवर निसर्ग हायटेक नर्सरी विडणी जवळ नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूर कडून फलटण बाजूकडे येणाऱ्या बजाज डिस्कव्हर मोटरसायकल क्रमांक एम एच ४५ जे ८७४४ या वाहनावरील चालक संतोष जालिंदर सोरटे व त्यांची पत्नी उज्वला संतोष सोरटे रा. नातेपुते ता. माळशिरस हे फलटण येथे नातेपुते वरून येत असताना, फलटण बाजूकडून नातेपुते बाजूकडे जाणारी हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक नसलेला चालक धुळदेव अरविंद वाघमोडे वय ३५ रा. मांडवे ता. माळशिरस जि. सोलापूर हा आपल्या ताब्यातील मोटरसायकल भरधाव वेगाने व  हयगईने चालवून, रस्त्याच्या उजव्या बाजूस रॉंग साईडला येऊन, नातेपुते बाजूकडून येणाऱ्या मोटार सायकलला जोराची धडक दिल्याने, चालक वाघमोडे  मोटरसायकल वरून उडून खाली रस्त्यावर पडले. त्याचवेळी पंढरपूर बाजू कडून येणाऱ्या १८ चाकी ट्रेलर क्रमांक एम एच ४ जी के ८८८१ या गाडीच्या चाकाखाली धुळदेव वाघमोडे गेल्याने, त्याच्या डोकीस, तोंडास, छातीस गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच मयत झाला. तर नातेपुते बाजूकडून  येणारे सोरटे दाम्पत्य  मोटरसायकल वरून  डांबरी रोडवर खाली पडल्याने त्यांच्या हात, पाय व पोटात  किरकोळ व गंभीर दुखापत झाली.

सदरचा अपघात हा मोटार सायकल चालक धुळदेव अरविंद वाघमोडे याच्या चुकीमुळे झाला असून, त्याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल  हयगईने-अविचारेने भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या रॉंग साईडला येऊन, मोटरसायकलला जोरात धडक देऊन मोटरसायकल वरून उडून रोडवर पडून, समोरून येणाऱ्या चालत्या ट्रकच्या चाकाखाली सापडून स्वतःच्या मरणास तसेच सोरटे दाम्पत्याच्या गंभीर दुखापतीस व दोन्ही मोटरसायकलच्या नुकसानीच कारणीभूत ठरला असल्याची फिर्याद संतोष जालिंदर सोरटे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरगडे करीत आहेत.

No comments