स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सातारा जिल्ह्यात विविध कार्यक्रम संपन्न
सातारा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 रोजी घरोघरी तिरंगा अभियान व स्वराज्य महोत्सव दि. 9 ते दि.17 ऑगस्ट 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध शासकीय विभाग त्या अंतर्गत असलेल्या कार्यालयांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. महाबळेश्वर, वाई, कोरेगाव, पाटणसह जिल्ह्यातील इतर तालुक्यात विविध कार्यक्रम संपन्न झाले.
महाबळेश्वर येथे आमदार मकरंद पाटील यांचे हस्ते ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत महाबळेश्वर येथे ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते महाबळेश्वर येथे करण्यात आले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कोरेगाव तालुका प्रशासनाच्यावतीने प्रभात फेरीचे आयोजन - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोरेगाव नगरपंचायत व तालुकास्तरीय प्रशासनातर्फे प्रभात फेरीचे कोरेगाव शहरातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रभात फेरीमध्ये प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसिलदार अमोल कदम, पोलीस निरीक्षक नितीन सावंत, नायब तहसिलदार सुयोग बेंद्रे, मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यासह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता
राष्ट्रगीत म्हणून तिरंगा प्रभात फेरी सुरुवात करण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा उत्स्फूर्तपणे देत महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी व नगरपंचायत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिस्तबध्द पध्दतीने तिरंगा रॅली काढली. या तिरंगा रॅलीमध्ये कोरेगाव शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, नागरिक, नगरसेवक सहभागी झाले होती. रोटरी गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन प्रभात फेरीची सांगता करण्यात आली.
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाला विविध शाळेंच्या भेटी -
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळांनी भेटी दिल्या आहेत.
विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या 1 ते 21 संहिता खंडांमध्ये थोर क्रांतिकारक सेनानी, नेते इत्यादींवर नोंदी लिहिण्यात आल्या आहेत. या नोदींचे वाचन करण्यात येत आहे. 4 ऑगस्ट 2022 रोजी नरसिंह विद्यालय, धोम, ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल, वाई या शाळेंनी भेटी दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांना विश्वकोश आणि कुमार विश्वकोश बाबत मार्गदर्शन कण्यात आले.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत पाचगणी व तापोळा येथील गरोदर मातांची तपासणी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्वानिमित्त प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा या ठिकाणी गरोदर माता यांची तपासणी करण्यात आली. या शिबीरामध्ये 21 गरोदर मातांची तपासणी केली. यावेळी गरोदर महिलांची आरोग्य तपासणी मध्ये पोटाची तपासणी, डॉपलर, सामान्य तपासणी, रक्त तपासणी, यूएसजी तपासणी करण्यात आली.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पांचगणी येथे गरोदर माता तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबीरामध्ये 76 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. तापोळा व पाचगणी येथे आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविण्यात आले.
चेवलेवाडी येथील प्राथमिक शाळेत चित्रकला स्पर्धा संपन्न
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त चेवलेवाडी ता. पाटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वत:च्या कल्पकतेने चित्र काढलेले आहेत. विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती, देशप्रेम, भारतीय जवानांविषयी कृतज्ञता, भारताने केलेली वैज्ञानिक प्रगती या विषयी आपल्या भवना चित्रातून रेखाटलेल्या आहेत.
शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना पाटसकर, उपशिक्षिका शैलजा गाडेकर, वैशाली जाधव यांनी मार्गदर्शन केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र रेठरे बु. ता. कराड अंतर्गत बेलवडे बु. येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व घरोघरी तिरंगा याबाबत प्रभात फेरी काढण्यात आली.
No comments