Breaking News

राजकीय ताकदीचा गैरवापर सध्या फलटण तालुक्यात चालू आहे - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

महादेव कोंडीराम पोकळे व त्यांच्या बंधूंचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर समवेत आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर (छाया - योगायोग फोटो)
Abuse of political power is going on in Phaltan taluka - Shrimant Ramraje Naik Nimbalkar

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - राजकीय ताकदीचा गैरवापर सध्या फलटण तालुक्यात चालू आहे, सध्या काही जणांना तडीपार केले आहे, परंतु तडीपार करताना फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तडीपार करण्यात आले आहेत,  खासदार गटाच्या कार्यकर्त्यांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांची नावे मात्र तडीपार यादीत नाहीत,  राजकीय सत्तेचा गैरवापर, राजकीय ताकदीचा गैरवापर, विकासाच्या कामासाठी न करता, प्रशासनाला हाताशी धरून, प्रशासनाच्या मार्फत राजकारण करण्याची प्रवृत्ती या तालुक्यात व जिल्ह्यात वाढलेले आहे आणि ती  मोडूनच काढावी लागणार असल्याचे  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

फलटण येथील अनंत मंगल कार्यालय येथे माजी जि. प. सदस्य महादेव कोंडीराम पोकळे यांचा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. प्रवेशाच्या कार्यक्रमात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण तालुक्यातील विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवेश कार्यक्रमात बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (छाया - योगायोग फोटो)

 मुंबईत ट्रायडेंट हॉटेलला यांचा मुक्काम

पुढे बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले, आज सत्ता बदल झाला आहे, पण खासदारांनी कितीही प्रयत्न केले तरी फलटण तालुक्यातील माणसांची मने ते कधीही जिंकू शकणार नाहीत. आणि आम्ही जिंकूही देणार नाही. मला एका नागरिकाचा मेसेज आला होता की पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर  दबाव टाकून कामे करून घेत आहेत, यात नवीन काही नाही,  ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस देखील या जोडगोळीची हीच पद्धत होती आणि आताही तीच पद्धत चालू आहे, काही बदल होणार नाही, जोडगोळी मतदार संघात कमी आणि मुंबईला जास्त असते, मुंबईत ट्रायडेंट हॉटेलला यांचा मुक्काम असतो आणि तेथूनच फोनद्वारे दबाव आणण्याचे काम सुरू असल्याची टीका श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.

... यांचाही फुगा फुटणार आहे

आज महादेव पोकळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे. ते  पूर्वी खासदार गटामध्ये कार्यरत होते. खासदार यांच्या कार्यपद्धतीनुसार आगामी काळामध्ये तालुक्यातील खासदारांच्या गटामध्ये खासदार स्वतः व त्यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकरच शिल्लक राहतील. त्यांचे बाकीचे कार्यकर्ते हे आपल्याकडे येतील किंवा घरी बसतील. साखरवाडी कारखान्याचा अखेर फुगा फुटलाचना, तसंच यांचाही फुगा फुटणार आहे, खासदारांचा एकच धंदा तो म्हणजे नवं जुनं करणं, त्यामुळे आज ना उद्या यांचाही फुगा फुटणार आहे. 

... तर पुन्हा जुने दिवस यायला वेळ लागणार नाही

या तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी खूप फिरलोय, जीव लावून काम केले आहे, आता तालुक्याचे राजकारण चांगल्या लोकांच्या हातात गेले नाही तर पुन्हा जुने दिवस यायला वेळ लागणार नाही, त्यामुळे यांना रोखण्याची तुमची व माझी जबाबदारी आहे, पुढची माणसं चांगली पाहिजेत, सर्वसामान्यांना दिलासा देणारी पाहिजेत, सर्वसामान्यांचे काम करणारी पाहिजेत,  काम करून घेण्याची पद्धत  या तालुक्यात आणि जिल्ह्यात आहे, परंतु  जिल्ह्यात आज काय परिस्थिती दिसते आहे, ते आपण पाहता, राजकीय परिस्थिती पाहता सामाजिक व जिल्ह्याची संस्कृती, ही टिकली आहे असे वाटते का ? ज्यावेळी आम्ही राजकीय नेते मंडळी दिल्लीला जात होतो, त्यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यातील व त्यांच्या मतदारसंघातील म्हणून ओळख होती, आज तशी परिस्थिती नाही, थोडक्यात चांगली माणसं जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर गेली पाहिजेत, त्यांची सर्वसामान्य माणसाशी नाळ जोडली पाहिजे, विकासाची कामे केली पाहिजेत.

जयकुमार गोरे यांना मुल - संसार आणि नातवंडे किती ?

उतार वयात नातवंडासोबत बसा, असे आ. जयकुमार गोरे म्हणाले होते, त्याचा समाचार घेताना, श्रीमंत रामराजे म्हणाले की,  मी नातवंडासोबत बसू शकतो. परंतु, मला तुम्हाला एक विचारायचे आहे की, तुम्हाला मुल किती आहेत,  संसार किती आहेत, आणि नातवंडे किती आहेत तेही सांगा? असा सवाल करत कोरेगाव एमआयडीसीबाबत खुलासा केला. 

कोरेगाव एमआयडीसीचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा ...

जयकुमार गोरे म्हणतात की आमचा माण चा संबंध नाही, गोरे कुटुंबीय राजकारणात नव्हते, त्यावेळी पासून आमचा माण तालुक्याशी संबंध आहे, म्हसवड, माण येथे आमच्या शैक्षणिक संस्था आहेत, २००९ पूर्वी पर्यंत फलटण तालुक्यातील ३६ गावे ही, माण मतदार संघाचा आमदार निवडून देत होती. आणि हे म्हणतात माणशी आमचा संबंध काय, कारण नसताना भांडणे काढण्यात काही अर्थ नाही, कॉरिडोरची एमआयडीसी ही कुठल्याही तालुक्यासाठी नाहीये, कॉरिडॉर एमआयडीसी ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाची असून, ती पूर्ण जिल्ह्यासाठी आहे. कोरेगाव एमआयडीसीचा निर्णय झाला तो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बैठकीत, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सुचवलेल्या ठिकाणी एमआयडीसी होणार आहे, परंतु जयकुमार गोरे हे माझ्या नावाने ओरडत असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

१९९१ साली राजकारणात प्रवेश केला, त्यावेळी आमच्याकडे कोणतीही सत्ता नव्हती, फक्त एक सोसायटी होती, एका सोसायटीवर राजकारण सुरू करून,  फलटण तालुक्याचा विकास केला, तरुणांचे भविष्य घडवले, तालुका दुष्काळातून बागायती केला. सत्तेचा कधीही गैरवापर केला नाही, आज महादेव पोकळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे, खऱ्या अर्थाने आज ते विकासाच्या प्रवाहात आलेले आहेत. तुम्ही विकासाच्या कामाकडे लक्ष द्या, आम्ही तुम्हाला बळ देऊ असे आश्वासन यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पोकळे यांना दिले.

No comments