मोकाट जनावरे पकडण्याची मोहिम फलटण येथे सुरु
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २२ : फलटण नगर परिषदेने भटकी पाळीव जनावरे आणि डुकरे रस्त्यांवर मोकळी न सोडण्याचे आवाहन नागरिकांना करुनही शहरात विविध ठिकाणी अशी मोकाट जनावरे आढळल्यानंतर सुरक्षीततेच्या कारणास्तव नगर परिषदेने सदर जनावरे पकडली असून ती नगर परिषद वाहन तळावर ठेवण्यात आली आहेत. संबंधीतांनी नगर परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी केले आहे.
जनावरांमधील वाढत्या लंपी स्किन (एल. एस. डी.) आजार प्रादुर्भाव रोखण्याबरोबर जनावरांना तातडीने लसीकरण करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले होते, तसेच भटकी जनावरे व डुकरे आणि तत्सम सर्वच भटकी जनावरे मालकांनी ती त्वरित शहरातील रस्ते अथवा सार्वजनिक ठिकाणावरुन काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र त्याबाबत संबंधीतांनी योग्य कार्यवाही न केल्याने नगर परिषदेने खास मोहिम राबवून सदर पाळीव जनावरे पकडुन नगर परिषद कार्यालय लगत वाहन तळावर ठेवली आहेत. तेथे त्यांना चारा, पाणी देण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी सांगितले आहे.
सदरच्या भटक्या जनावरांच्या मालकांनी तात्काळ दंडात्मक शुल्क भरुन आपली जनावरे घेऊन जावीत व पुन्हा जनावरे रस्त्यावर सोडणार नाही असे प्रतिज्ञापत्र नगर परिषदेस सादर करावे, ६ दिवसाच्या आत जे मालक आपली भटकी जनावरे घेऊन जाणार नाहीत त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची संबंधीत भटके जनावरांच्या मालकांनी नोंद घ्यावी, भविष्यात रस्त्यावर भटके जनावरे आढळल्यामुळे वाहतुकीस अडथळा झाला व रस्त्यावर अस्वच्छता निदर्शनास आल्यास संबंधीताविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी कळविले आहे.
शहरातील रस्त्यावर भटकी जनावरे आढळल्यास दूरध्वनी क्रमांक 7709342037 वर संपर्क साधून त्याबाबत माहिती देण्याचे आवाहन फलटण नगर परिषद स्वच्छता निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
शहरात धुमाकूळ घालणाऱ्या आणि सर्वत्र अस्वच्छता पसरविणाऱ्या मोकाट डुकरांचा असाच कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
No comments