Breaking News

पावसात पाठलाग करून फलटण ग्रामीण पोलिसांनी पकडली टोळी ; १० गुन्हे उघडकीस ; ७ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

The gang was caught by the rural police; 10 Crime detection; 7 lakh 45 thousand rupees seized

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२-  मुसळधार पावसात धुमाळवाडी ता. येथील ओढयातील पुराच्या पाण्यातून, फलटण ग्रामीण पोलिसांनी  पाठलाग करून, मोटार सायकल चोरी करणारी टोळी शिताफीने पकडली. आरोपींकडून मोटार सायकल चोरीचे ०९ व एच.टी.पी.पंम्प चोरीचा ०१ असे एकुण १० गुन्हे उघडकीस आणून, त्यामध्ये एकुण ७,४५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये एकुण ०३ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

मोटार सायकल चोरी करणारी टोळी समवेत फलटण ग्रामीण पोलिस 

  फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली होती.  मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होऊन ते उघड करण्याकरीता गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून विशेष पथक तयार करण्यात आले होते. हे विशेष पथक दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरी अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना आरोपी नामे १) श्रेयस उत्तम माळे रा. दुधेबावी ता. फलटण, जि. सातारा २) अमित विठ्ठल हुंबे रा. धुमाळवाडी ता. फलटण, जि. सातारा ३)गणेश अरुण जगदाळे रा.मोगराळे ता.माण जि.सातारा यांचा सहभाग असल्याची गोपनीय माहिती मिळाली. 

  मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन वरील संशयित १) श्रेयस उत्तम नाळे रा. दुधेबावी ता. फलटण. जि. सातारा २) अमित विठ्ठल हुंबे रा. धुमाळवाडी ता. फलटण, जि. सातारा ३)गणेश अरुण जगदाळे रा. मोगराळे ता.माण जि.सातारा यांना, फलटण ग्रामीण पोलिसांनी २४ तास गणपती विसर्जन बंदोबस्त करून, क्षणाचीही विश्रांती न घेता, मुसळधार पावसात धुमाळवाडी येथील ओढ्यातील पुराच्या पाण्यातून, जिवाची पर्वा न करता, आरोपींचा पाठलाग पोलिसांनी केला.  यामध्ये पोलीस नाईक काशिद हे किरकोळ जखमी झाले असताना देखील मनोधैर्य खचू न देता, पाठलाग करून आरोपींना पकडण्यात यश मिळवले. 

पकडलेला आरोपींकडे दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपूस करता,  त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून त्याचेकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यपूर्ण तपास केला असता, त्यांनी फलटण तालुक्यामध्ये तसेच मुंबई, पुणे शहर, खेड शिवापुर, शिरवळ, इंदापुर या ठिकाणाहून चोरलेल्या एकुण ०९ मोटार सायकल व शेतीमध्ये औषध फवारणीसाठी लागणारे एच.टी.पी. पंपाच्या ०१ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यानुसार विविध गुन्ह्यांतील सुमारे ६,६५,०००/- रुपये किंमतीच्या ०९ मोटार सायकली व ०१ एम.टी.पी. पंम्प तसेच आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली ८०,०००/-रु. किमतीची मोपेड मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. सदरची मोटार सायकल ही आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी वापरल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरु असून अटक आरोपींच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.पो.नि. अक्षय सोनवणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहा. पोलीस फौजदार राऊत, पोलीस हवालदार प्रकाश खाडे, पोलीस नाईक अभिजीत काशिद, पोलीस नाईक वैभव सूर्यवंशी, पोलीस नाईक अमोल जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल महेश जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटोळे, पोलीस कॉन्स्टेबल निखील गायकवाड यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.

No comments