जीएसटी अधिकारी भरती घोटाळा ; 42 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक ; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३ - जिएसटी विभागात अधिकारी पदावर नोकरीस लावतो असे सांगून, खोटी बनावट ट्रेंनिग ऑर्डर देऊन, ११६ मुलांची, एकूण ४२ लाख ७३ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी ७ जणांविरुद्ध फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. संशयित आरोपींमध्ये फलटणच्या तिघांचा समावेश आहे. मारुती गुलाबराव मोहिते रा. राजाळे ता. फलटण, रवी अंकुश वणवे रा. मलठण, फलटण, चंद्रजित अनिल पाटील रा. कुंडलापूर ता. कवठेमहांकाळ, संदेश लोटलीकर रा. मुंबई, नितीन चतुर्वेदी, सचिन चतुर्वेदी दोघे रा. मथुरा उत्तर प्रदेश व कैलास भारत दोशी रा. लक्ष्मीनगर फलटण अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, नितीश पोपटराव भोसले वय २८ रा. संजीवराजे नगर फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीत, म्हटले आहे की, १० सप्टेंबर २०१७ मध्ये मारुती मोहिते यांनी नितीन भोसले यांच्या घरी येऊन, मी तुम्हाला नोकरीला लावतो असा सांगत कागदपत्रे मागितली. कागदपत्रे जामविल्याचे सांगितल्यावर मोहिते यांनी, भोसले यांना रवी वणवे याच्या मलठण येथील घरी बोलावून घेतले व तेथे त्यांना, जीएसटी असिस्टंट या पदासाठी नोकरीला लावतो असे सांगितले. त्यानंतर २०१७ मध्ये वाशी नवी मुंबई येथील फोर पाँईट पंचतारांकित हॉटेल मध्ये कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मोहिते, वणवे, पाटील व लोटलीकर यांनी तुमचे सिलेक्शन झाले आहे असे सांगितले व ऑर्डरची प्रत न देता, २५ हजार रुपये रोख स्वरूपात मागून घेतले. तिथे आणखी ४० ते ५० मुलेही कागदपत्रे पडताळणी साठी आलेली होती. त्यांच्याकडूनही पैसे घेण्यात आले.
त्यानंतर ७ जानेवारी २०१९ पूर्वी १० दिवस भोसले यांना सही शिक्का असलेली ट्रेंनिग ऑर्डर पोस्टाने प्राप्त झाली. त्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स मॅनेजमेंट दिल्ली फरिदाबाद येथे ट्रेनिंग असल्याचे नमूद होते. यानंतर वाशी नवी मुंबई येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये ३० हजार रुपये डिपॉझिट भरावे लागेल असे वणवे व मोहिते यांनी फोनद्वारे सांगितले, सदर पैसे रोख स्वरूपात आपण दिले त्यावेळी तिथे अन्य ३० ते ४० मुले होती, त्यांच्याकडूनही असेच पैसे घेण्यात आले. व प्रत्येकी दोन कोरे चेक व कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर फलटण येथे सुमारे २५ ते २५ मुलांना प्रत्येकाकडून त्यांना मिळणाऱ्या पोस्टप्रमाणे वेगवेगळ्या रकमेची मागणी करून, सदर पैसे त्याच दिवशी भरण्यास सांगितले. त्यानुसार रवी वणवे व मारुती मोहिते यांनी भोसले यांना २ लाख रुपयांची मागणी केली, सदर रक्कम त्यांनी त्या दोघांना रवी वणवे याच्या घरी रोख दिली. यानंतर एप्रिल २०१९ मध्ये वणवे व मोहिते यांनी फोन करून, अभिनव एज्युकेशन सोसायटी अंबेगाव, पुणे येथे १० दिवसांचे ट्रेंनिग असल्याचे सांगितले. या ट्रेंनिगला ११७ मुले हजर होती. ट्रेंनिग दरम्यान नितीन चतुर्वेदी व सतीश चतुर्वेदी यांनी, त्यांचेकडून २० हजार रुपये रोख, ५०० चा एक व १०० चे दोन स्टॅम्प पेपर सरकारी सर्व्हिस बॉण्ड करण्यासाठी घेतले. यानंतर दोन महिन्यांनी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घेतले व दिल्ली येथील एका संस्थेच्या ऑफिस मध्ये नेले, व तिथे त्यांनी त्यांच्याकडून १५,५०० रुपये घेतले व लॉक डाऊन संपल्यानंतर जॉइनिंग लेटर येईल असे सांगितले. परंतु अद्याप पर्यंत, जॉइनिंग लेटर न आल्याने, वणवे व मोहिते यांना, याबाबत समक्ष व फोनद्वारे विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली, तर २९ मार्च २०१२१ रोजी चंद्रजित अनिल पाटील यांनी झूम अँपवर मिटिंग घेत, तुमचे नॉमिनेशन झाल्याचे व लवकरच जॉइनिंग लेटर पाठवू असे सांगत, आमच्यावर विश्वास नसेल तर, तुम्ही पोलिसांकडे तक्रार करू शकता असे सांगितले, परन्तु आजपर्यंत जॉइनिंग ऑर्डर न आल्याने भोसले यांनी, मारुती मोहिते यांच्याकडे तगादा लावल्यानंतर, त्यांनी १ लाख रुपये रोख परत दिले. व उर्वरित रक्कम देत नाही असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे भोसले यांची १ लाख ९० हजार ५०० रुपयांची फसवणूक झाली. भोसले यांच्या प्रमाणेच दिपक सुरेश मेंगावडे, रा. रुई, ता. बारामती जि.पुणे यांना जी एस टी इन्स्पेक्टर या पदासाठी वरील लोकांनी 1,65,000/-रुपये, अमोल बबनराव तावरे यास जी एस टी इन्स्पेक्टर या पदासाठी 2,90,000/-रुपये, योगेश नंदकुमार घाडगे रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा व त्याचे सोबत चार मुलांना जी एस टी इन्स्पेक्टर या पदासाठी 14,78,000/- रुपये घेतले असुन सुर्याली सोमनाथ भांडवलकर, जगदीश सोमनाथ भांडवलकर, दोन्ही रा. मठाचीवाडी ता. फलटण, ऋतिक शहाजी सस्ते रा. बोडकेवाडी ता. फलटण यांना जी एस टी इन्स्पेक्टर या पदासाठी त्यांचेकडुन 21,50,000/- रूपये रोख स्वरूपात कैलास भारत दोशी रा. लक्ष्मीनगर फलटण यांनी घेतले असुन इतर मुलांना चंद्रजित पाटील याने मध्यस्थी एजंटच्या मार्फत पैसे घेवून, तुम्हाला जीएसटी ऑफिसमध्ये नोकरीला लावतो. असे सांगुन त्याची पण फसवणुक केलेली आहे.
No comments