Breaking News

तडीपारीच्या विरोधात कामगार संघर्ष संघटनेचे उपोषण

Kamgar Sangharsh Sanghatna movement against Tadipari

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ सप्टेंबर - कामगार संघर्ष संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मंगेश आवळे व रोहित अडागळे यांची तडीपारी मागे  घेण्यात यावी याकरिता  फलटण उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बाहेर, अध्यक्ष सनी घनश्याम काकडे यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघर्ष संघटनेचे पदाधिकारी उपोषणास बसले होते. या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) च्या वतीने पाठिंबा देण्यात आला. दरम्यान उपोषण स्थळी पोलीस प्रशासनाने उपोषणकर्त्यांची भेट घेतली. व संबंधित कारवाईबाबत चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.

    कामगार संघर्ष संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मंगेश आवळे व रोहित अडागळे यांच्यावर पोलीस प्रशासन व उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ ते  दिनांक ९ सप्टेंबर २०२२ पर्यंत तडीपार करण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर, कामगार संघर्ष संघटनेकडून सदरची तडीपारी मागे घ्यावी अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने कामगार संघर्ष संघटनेचे अध्यक्ष सनी घनश्याम काकडे, महादेव गायकवाड, अमर झेंडे, सुरज भैलुमे व इतर पदाधिकारी आज दि. १ सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले होते.  उपोषणास रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. याप्रसंगी रिपाइंचे मधुकर काकडे, विजय येवले, मुन्ना शेख, राजू मारुडा, सतीश अहिवळे, लक्ष्मण अहिवळे, तेजस अहिवळे तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय भोंडवे उपस्थित होते.

     समाजात चळवळीचे काम करत असणाऱ्या व   अन्याय - अत्याचाराच्या विरोधात लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर अशा कारवाई होत असतील तर त्या योग्य नाहीत. मंगेश आवळे व रोहित आडागळे यांच्या विरोधात प्रशासनाने सूडबुद्धीने तडीपारीचे आदेश दिले आहेत. आणि कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या उपोषणाला जर न्याय मिळाला नाही तर पुढे मोठे आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा रिपाईचे जिल्हा सचिव विजय येवले यांनी यावेळी केले.

    समाजावर होत असणारा अन्याय - अत्याचार रोखण्यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतात, समाज जोडण्याचे काम करतात, समाजाला न्याय देण्याचे काम करतात आशा कार्यकर्त्यांविरोधात तडीपारी करणे हे योग्य नाही, कुविख्यात गुन्हेगारांवर जशी कारवाई  करावी तशी कारवाई सामाजिक कार्यकर्त्यावर होतं आहे हे चुकीचे आहे. झालेली तडीपारीची कारवाई मागे घेतली नाही तर मोठे आंदोलन उभे करू असा इशारा विजय भोंडवे यांनी दिला.

No comments